सरकारने थकविले होते २ कोटी रुपये -मुलांना ओलिस ठेवणारा रोहित आर्य पुण्याचा रहिवासी असल्याचेही समोर आले आहे. दीपक केसरकर मंत्री असताना शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी त्याला टेंडर मिळाले होते. पण त्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्यने केला. केसरकर मंत्री असताना रोहित आर्यने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते, अशीही माहिती समोर येत आहे.
मुंबई- माझी शाळा सुंदर शाळा योजनेत रोहित आर्य सहभागी होते. तसेच रोहित आर्यला मी शिक्षणमंत्री असताना स्वतः चेकने पैसे दिले असल्याची माहिती शिवसेना नेते व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे. इतकेच नव्हे तर पीएलएस प्रकल्पासाठी रोहित आर्यचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथे आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्यने काही मुलांना बंधक बनवून ठेवले होते. त्यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर रोहित आर्यच्या बद्दल दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.
रोहित आर्यने दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण देखील केले होते. तसेच सरकारने पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे 2 कोटी रुपये थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता. दीपक केसरकर या संदर्भात बोलताना ते म्हणाले, रोहित आर्य माझी शाळा सुंदर शाळा योजना चालवत होते. त्यांनी काही मुलांकडून वसुली देखील केली असल्याची माहिती डिपार्टमेंटकडून समजले होते. त्यांचे म्हणणे होते की आपण असे काही फी वसूल केलेली नाही. पण अशा पद्धतीने मुलांना ओलिस ठेवणे चुकीचे आहे.
पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी स्वतः त्यांना चेकने पैसे दिले होते. सरकारचे जे पेमेंट असते त्यासाठी सगळ्या प्रोसेस पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे त्यांचा जो आरोप आहे की 2 कोटी रुपये मला मिळाले नाही हे योग्य वाटत नाही. यासाठी त्यांनी विभागाशी संपर्क साधावा आणि यासाठीचे डॉक्युमेंट सादर करावे. तसेच रोहित आर्य विक्षिप्त वाटत होता का? असा प्रश्न विचारला असता केसरकर म्हणाले, ते कोणाचे ऐकत नव्हते, असे मी म्हणेल. बाकी कोणावर पर्सनल कमेन्ट करणे योग्य नाही.
पीएलसी प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रोहित आर्यचे कौतुक केल्याची माहिती आहे. त्यानंतरच हा प्रकल्प राज्यात चालू झाला अशी माहिती देखील समोर आली आहे. पण या प्रकल्पाच्या फक्त कन्सेप्ट साठी सरकार पैसे देत नसते, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच रोहित आर्यचा असा देखील आरोप होता की चुकीच्या शाळांना चांगले गुण देण्यात आले होते. याविषयी बोलताना केसरकर म्हणाले, त्यांनी उपोषण केले होते आणि मी यापूर्वी देखील सांगितले होते की व्यक्तिगत सहानुभूती म्हणून मी त्यांना पैसे दिले होते. पण नियमाचे पालन करावेच लागते. अशा पद्धतीने मुलांना डांबून ठेऊन असे काही करणे योग्य नाही, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

