पुणे : शहरात सध्या महाप्रीत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामांमुळे नागरिकांना खड्डे, धूळ, आणि वाहतुकीतील अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून समन्वय, सुरक्षितता आणि योग्य पुनर्डांबरीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
५०० किमी खोदकाम, १२५ किमी भागात दुप्पट कामे
शहरातील विविध भागांमध्ये महाप्रीत आणि सीसीटीव्ही या दोन स्वतंत्र योजनांसाठी सुमारे ५०० किलोमीटर खोदकाम सुरू आहे. यातील सुमारे १२५ किलोमीटरचा भाग समान क्षेत्रात असून, दोन्ही कामे एकत्रितपणे करण्याबाबत पालिकेत बैठक होऊन निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सीसीटीव्ही कामाचा ठेकेदार आधी खोदकाम करून नंतर महाप्रीत कंपनीकडून त्याच भागात पुन्हा खोदकाम होत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास होत आहे, असे घाटे यांनी नमूद केले आहे.
पुनर्डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
पालिकेने “रस्त्यांना कमीत कमी छेद घेऊन खोदकाम करावे” अशा सूचना दिल्या होत्या, तरी मोठ्या आकाराचे खड्डे घेतले जात आहेत. त्यानंतर फक्त खडी टाकून काम अपूर्ण ठेवले जाते, त्यामुळे रस्त्यावर खडी पसरून वाहनघसर अपघात वाढत आहेत, असे घाटे यांनी निदर्शनास आणले.
शिवदर्शन चौक, ई-लर्निंग स्कूलसमोर आणि इतर ठिकाणची कामे पाहिल्यास या समस्येचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.
ठेकेदारांवर कारवाईची मागणी
घाटे यांनी ठेकेदारांकडून रस्त्यावर खडी न पसरण्याची, पुनर्डांबरीकरण नीट करण्याची आणि योग्य बॅरिकेडिंग व सूचना फलक लावण्याची हमी घेण्याची मागणी केली आहे. नियमभंग झाल्यास संबंधित ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी त्यांनी आयुक्तांना विनंती केली आहे.
जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता
जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांवर मिलिंगचे काम सुरू आहे. मात्र, त्यानंतर तातडीने डांबरीकरण होत नसल्याने वाहने घसरत आहेत. त्यामुळे मिलिंगनंतर २४ ते ४८ तासांच्या आत पुनर्डांबरीकरण करणे बंधनकारक करावे, अशी मागणी घाटे यांनी केली आहे.
तसेच या कामांदरम्यान सुरक्षा निकषांचे पालन, दिशादर्शक फलक व चेतावणी चिन्हे लावणे अनिवार्य करावे, असेही त्यांनी सुचवले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीचे निर्देश अपेक्षित
शहराच्या सौंदर्याचे जतन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वय साधून कामे व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशी विनंती घाटे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

