पुणे- जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर गोखले यांच्यातील हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणिा धर्मादाय आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. आज या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांसमोर झाली. या सुनावीणीनंतर धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत. मात्र, बिल्डर गोखलेने बोर्डिंग ट्रस्टला दिलेले २३० कोटी रुपये हे कोर्टाच्या आदेशाने मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी नऊ दिवसांपूर्वी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. धर्मादाय आयुक्तांच्या स्थगितीच्या आदेशानंतर या व्यवहारातून आपण आपण माघार घेत असल्याची घोषणा गोखले बिल्डर्स यांनी केली. यासंदर्भात बिल्डर विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. या ई-मेलमध्ये त्यांनी आपले जमा केलेले 230 कोटी रुपये परत मिळावेत, अशी मागणी केली.
आज या प्रकरणाची धर्मादाय आयुक्तांसमोर पुन्हा सुनावणी झाली. धर्मादाय आयुक्त यांनी 4 एप्रिल 2025 रोजी स्वत: या व्यवहाराला मान्यता देणारे आदेश आता रद्द केला आहे. या व्यवहारात गोखले बिल्डरने ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये परत मिळवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा केली होती. मात्र, हा निर्णय आपल्या हातात नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी भरलेली रक्कम परत मिळविण्यासाठी गोखले बिल्डरला न्यायालयात कायदेशीर लढा लढावा लागणार आहे.
जैन बोर्डिंग हॉस्टेलची स्थापना 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी केली होती. अलीकडे या जागेच्या पुनर्विकासाचा विषय चर्चेत आला होता, मात्र विक्री प्रक्रियेत अनियमितता आणि परस्पर व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी विश्वस्तांनी जागेचा नवीन विकास करण्याचा निर्णय घेतला, पण जैन समाजातील काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर ही जागा परस्पर विकण्यात आल्याचा आरोप जैन समाजाने केला. या जागेच्या विक्रीला धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी देताना नियम पायदळी तुडवल्याचा आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
या व्यवहारावरून जैन समाज देखील आक्रमक झाला होता. हा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी जैन मुनींकडून बुधवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले. मात्र आता धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिल्याने हा वाद मिटल्याचे दिसत आहे.

