२४ तास आस्थापना सुरू ठेवणेबाबत शासनाचे परिपत्रकाबाबत चर्चा
पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, कार्यक्षेत्रातील व्यापारी संघटनांच्या बैठकीतील माहिती
वाढत्या बांधकामाचे सुसाट पेव ,रीडेव्हलपमेंट म्हणजे इमारतींचा पुनर्विकास आणि TDR च्या नावाखाली १०० कुटुंब राहत होते तिथे ३०० /४०० कुटुंबे राहायला येऊ लागली , त्या प्रमाणात रस्ते मात्र मोठे झाले नाहीत,दुकानांचे हि तसेच ज्या दुकानात १०० ग्राहक उभे राहून खरेदीची क्षमता होती तिथे पोटमाळे अंतर्गत बांधकामे वाढवून ३००/ ४०० ग्राहक येऊ शकतील अशी क्षमता केली रस्ते मात्र वर्षानुवर्षे होते तेवढ्याच रुंदीचे , गर्दी वाढली त्या तुलनेत रस्त्यांच्या रुंदी, पार्किंग स्पेस वाढविण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत तर शहरात , उपनगरात वाहतूक कोंडी हि होणारच होती वाहतूक समस्या हि भेडसावणारच होती ..पण या मुळ कारणाकडे दुर्लक्ष करून वर वर मलमपट्टी करण्याचे काम कायम पुण्यात करण्यात आले आहे. कोणत्याही रस्त्याची , जागेची क्षमता असते.. त्याकडे दुलाक्ष करून बांधकामांचे, गर्दीचे केलेले नियोजन हेच वाहतूक कोंडी आणि समस्यांचे मुळ कारण होय, ज्याकडे महापालिका आणि पोलीस या दोहोंनी दुर्लक्ष तर केलेच पण शासनाच्या नगरविकास खात्याने देल्खील जाणून बुजून मूळ कारणाकडे पाहणे टाळले त्यामुळे येथील हि समस्या काहीही केले तरी सुटू शकणार नाही, इमारतींची उंची किती हे रस्त्यांच्या रुंदी पाहूनच ठरवायला हवी – शरद लोणकर
पुणे- पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ पुणे अंकित खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर, विश्रामबाग व डेक्कन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील विविध व्यापारी संघटना, अधिकृत पथारी संघटना, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांची काल अॅम्पी थिएटर, फर्ग्युसन कॉलेज कपांउंड, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीस व्यापारी, किराणा-भुसार व्यापारी, टिंबर मार्केट व्यापारी, ज्वेलर्स व्यापारी, पथारी संघटनेचे ४० ते ४५ सदस्य हजर होते.
यावेळी सर्व व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी त्यांना व्यवसाय करताना येत असताना येणाऱ्या अडी-अडचणी सांगितल्या. त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेवून पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, कृषिकेश रावले, यांनी उपस्थित असलेल्या व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांना येत असलेल्या अडी-अडचणींबाबत मार्गदर्शन करून त्यामध्ये अनाधिकृत पथारी यांचेवर कारवाई करणे, २४ तास आस्थापना सुरू ठेवणेबाबत शासनाचे परिपत्रकाबाबत माहिती दिली, भिडे ब्रिज हा बंद असल्यामुळे झेड ब्रिजवर पार्किंग होणा-या वाहनांवर वाहतुक विभागाकडुन कारवाई करण्यात येईल, अवजड वाहनांना शहरात बंदी असल्यामुळे व्यापारी यांनी मागिवलेला माल हा छोट्या वाहनांतुन आस्थापनांच्या ठिकाणी घेवून जावे, गल्ली-बोळात चुकीच्या पध्दतीने पार्किंग होणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल अनाधिकृत रिक्षा स्टॅन्डवर कारवाई करण्यात येईल त्या अनुषंगाने रिक्षा असोसिएशन बैठक घेण्यात येईल. पुणे मनपाच्या कामाच्या अनुषंगाने मनपा अतिरीक्त आयुक्त व मनपा आयुक्त यांची भेट घ्यावी. तसेच आस्थापनांमध्ये काम करीत असलेल्या सर्व कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे, तुळशीबागच्या परिसरातील व्यापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व लाऊडस्पीकरच्या वायर ह्या कापल्या जातात याबाबत विश्रामबाग व फरासखाना पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याबाबत अभ्यास करावा शनिवार व रविवार या गर्दीच्या दिवशी तुळशीबाग परिसरामध्ये महिलांकडुन चोरीचे प्रमाण जास्त असल्याने परिसरामध्ये महिला पोलीस अंमलदार यांची गस्त वाढविण्यात येईल. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील फुटपाथवर अनाधिकृतपणे पथारी व्यवसाय करणारे परप्रांतीय व्यवसायिकांवर कारवाई करून फुटपाथ मोकळा ठेवण्यात येईल तसेच सर्व व्यापा-यांनी आप-आपल्या आस्थापनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत, त्यामधील काही सीसीटीव्ही कॅमेरे हे रोडच्या दिशेने बसवुन पुढील बाजुचे छायाचित्रीकरण होईल यापध्दतीने बसवावे, सोने-हिरे व्यापा-यांनी मोठया प्रमाणावर सोने वाहतुक करताना पोलीसांना माहिती देवून पोलीस संरक्षणाची मागणी करावी. पोलीस विभागाकडुन दरमहा व्यापारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल व सदर बैठकीकरीता वाहतुक शाखा, पुणे मनपा यांचे प्रतिनिधी यांनाही हजर राहणेबाबत कळविण्यात येईल तसेच व्यापारी संघटनांनी मांडलेल्या अडचणींबाबत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ कृषिकेश रावले यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने वाहनकोंडी व वाहन पार्किंगची समस्या असून वाहन पार्किंग करताना नागरिक वेडया-वाकडया पध्दतीने पार्किंग करीत असतात त्याकरीता बाजारपेठांमधील सर्व व्यावसायिकानी सिक्युरीटीकरीता होमगार्डची मागणी केल्यास पोलीस विभागाकडुन मागणी प्रमाणे होमगार्ड पुरविणेकरीता कार्यवाही करण्यात येईल परंतु नेमण्यात आलेले होमगार्ड यांचे वेतन हे व्यापारी वर्गानी एकत्रित जमा करून त्यांना अदा करावे. मागणीप्रमाणे पुरविण्यात आलेले होमगार्ड हे सर्व काम करतील त्याकरीता आपण आपले व्यापारी वर्गाची बैठक घेवून आपणांस किती होमगार्डची आवश्यकता आहे याबाबतचे पत्र स्थानिक पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात यावे.
उपस्थित असलेले छोटे व्यापारी संघटना तुळशीबागचे पदाधिकारी अरविंद तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावर्षीच्या गणेश उत्सव कालावधीमध्ये पोलीसांनी केलेल्या उत्तम गर्दीच्या नियोजनामुळे व छत्रपती शिवाजी महाराज रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड व मंडई परिसरामधील सार्वजनिक रोडवर गर्दी व्यवसाय करणारे, पथारी व्यवसायीक यांचेवर प्रभावी कारवाई केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही त्याबाबत सर्व व्यापारी संघटनांचे वतीने पोलीस विभागाचे अभिनंदन केले. वरील प्रमाणे उपस्थित व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांना सुचना दिल्या.
सदर कार्यक्रम हा पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला असून, सदर कार्यक्रमाकरीता सहा. पोलीस आयुक्त फरासखाना/विश्रामबाग विभाग, पुणे शहर, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन, . शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन, प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डेक्कन पोलीस स्टेशन, प्रसाद राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजीनगर पोलीस स्टेशन, धनंजय पिंगळे हे उपस्थित होते. उपस्थित असलेल्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन, उमेश गित्ते यांनी आभार मानुन कार्यक्रमाचा समारोप केला.

