शक्तिशाली राफेल विमानातील पहिल्या उड्डाणाने माझ्या मनात देशाच्या संरक्षण क्षमतांबद्दल अधिकच अभिमान दाटून आला: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली 29 ऑक्टोबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (29 ऑक्टोबर 2025) अंबाला (हरियाणा) येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरून राफेल विमानातून उड्डाण केले. भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांमधून उड्डाण घेणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. यापूर्वी, त्यांनी 2023 मध्ये सुखोई 30 MKI मधून उड्डाण केले होते.

अंबाला येथील हवाई दलाचा तळ हा भारतीय हवाई दलाचा पहिला तळ आहे, जिथे फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन फॅसिलिटी येथून राफेल विमाने आली.

भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी सुमारे 30 मिनिटे उड्डाण केले आणि सुमारे 200 किलोमीटर अंतर कापले. त्यानंतर त्या हवाई दलाच्या तळावर परतल्या. 17 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी हे विमान उडवले. या विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे 15000 फूट उंचीवर, ताशी सुमारे 700 किलोमीटर वेगाने उड्डाण केले.
त्यानंतर राष्ट्रपतींनी अभ्यागत पुस्तकात एक संक्षिप्त संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांनी म्हटले आहे, “भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानातील माझ्या पहिल्या उड्डाणासाठी अंबाला येथील हवाई दलाच्या तळाला भेट देताना मला आनंद वाटत आहे. राफेल विमानातील उड्डाण हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. शक्तिशाली राफेल विमानातील या पहिल्या उड्डाणाने माझ्या मनात देशाच्या संरक्षण क्षमतांबद्दल अधिकच अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या उड्डाणाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचे आणि अंबाला येथील हवाई दलाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करते.”

यावेळी राष्ट्रपतींना राफेल आणि भारतीय हवाई दलाच्या परिचालन क्षमतांबद्दल देखील माहिती देण्यात आली.

