डॉ. प्रकाश जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ कादंबरीचे प्रकाशन
पुणे : गावकुसाच्या आतील आणि गावकुसाबाहेरील अनेक व्यक्तिरेखा डॉ. प्रकाश जाधव यांनी मनोविश्लेषणात्मक पद्धतीने ‘प्रक्षोभ’ या कादंबरीत मांडलेल्या आहेत. बुद्धिवादी संवेदनशील मनाचा प्रकाश या कादंबरीतून दिसतो आहे. वेदनेतून निर्माण झालेली ही कलाकृती मराठी साहित्यातील वैभव आहे,असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. वेदनेच्या जंजाळात अडकलेल्या या नायकाने कांदबरीच्या माध्यमातून आयुष्याचे सोने करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. प्रकाश जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. २८) ज्येष्ठ लेखिका इंदूमती जोंधळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षपदावरून बोलत होते. ज्येष्ठ लेखक भीमराव पाटोळे, सुप्रसिद्ध लेखक देवा झिंजाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगीर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
लेखकाने अनेक पात्रांची वास्तव भाषेत केलेली मांडणी भावते, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, मनोविश्लेषणात्मक केलेले लिखाण हा या कादंबरीचा आत्मा आहे.
भीमराव पाटोळे म्हणाले, जगण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या समाजासाठी ही कादंबरी मार्गदर्शक ठरणारी आहे. शालेय वयात मराठी बोलता, लिहिता न येणाऱ्या व्यक्तीला कादंबरी लिहिता येणे ही एक प्रकारे दैवी शक्ती आहे.
जगणे, भोगणे आणि लिहिणे यातील अंतर खूप कमी असलेला डॉ. प्रकाश जाधव हा माणूस आहे. लिखाणातून त्यांच्या मनाची अस्वस्थता दिसून येते. घरातूनच त्यांच्या शिक्षणाला विरोध झाला नसता तर ते लिहिते झाले नसते. आयुष्यात भोगलेल्या हालअपेष्टा लिखाणातून रिते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आयुष्यात जे घडले ते त्यांनी प्रांजळपणे मांडले आहे.
इंदूमती जोंधळे म्हणाल्या, समाजाचे देणे लागतो या भावनेने डॉ. प्रकाश जाधव यांनी स्वत:च्या शिक्षणासाठी पैसा नसतानाही २५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली यासाठी मोठे औदार्य लागते. हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षणाद्वारे ते स्वत: प्रकाशनमान झाले त्याचप्रमाणे इतरांच्या आयुष्यातही त्यांनी प्रकाश दिला.
लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रकाश जाधव म्हणाले, शिक्षण, लिखाणामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला. मराठी भाषेची जबाबदारी केवळ अभिजनांनीच घेतलेली नाहीये तर आम्ही सुद्धा घेतली आहे, हे मुद्दाम सांगावेसे वाटते.
शिरीष चिटणीस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर स्वागत आशुतोष रामगीर, रश्मी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जोग यांनी केले. आभार डॉ. संदीप सांगळे यांनी मानले.

