पुणे- खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ यशस्वीतेसाठी भाजपा नेते कार्यकर्ते एकत्रित बैठक येथे संपन्न झाली.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले कि,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ या संकल्पनेतून प्रेरित होऊन संपूर्ण देशभर ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ आयोजित केला जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे शहरात २ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण करणे, सामाजिक ऐक्य दृढ करणे आणि खेळांद्वारे एक सक्षम व निरोगी भारत घडवणे, हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. या खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे भाजपा मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात सविस्तर नियोजन बैठक घेतली. या बैठकीदरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. खरंतर खेळ हे विकास आणि संघभावनेचा पाया आहेत. त्यामुळे खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकात फिटनेसची सवय रुजवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडिया, फिट इंडिया’ या संकल्पनेला अनुसरून, पुणे लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विविध वयोगटांसाठी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणाईला निश्चितच प्रोत्साहन मिळेल, तसेच, उदयोन्मुख खेळाडूंना पुढे येण्याची संधी उपलब्ध होईल. या बैठकीस आमदार भीमराव तापकीर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, पुनीत जोशी, बापू मानकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

