पुणे: जैन ट्रस्टच्या भूखंडाचा सुमारे २३० कोटींचा व्यवहार रद्द करण्याची पुण्यातील गोखले बिल्डर, जैन ट्रस्टने या दोघांनी तयारी दाखवली आहे. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीतील जैन ट्रस्ट (सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट) प्रकरणात राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेला जैसे थे आदेश ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविला आहे. तोवर या दोघांना आपल्या भूमिकेबाबत प्रतिज्ञा पत्र सादर करण्यास सांगितले आहे.त्यामुळे आता पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.हा व्यवहार वादग्रस्त ठरल्यानंतर जैन समाजाच्यावतीने धर्मादाय आयुक्तांकडे या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ट्रस्ट संबंधित अर्जदारांतर्फे अॅड. योगेश पांडे तर प्रतिवादी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एलएलपीतर्फे अॅड. इशान कोल्हटकर आणि अॅड. एन. एस. आनंद उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींनी जैसे थे वाढविण्यास हरकत घेतली नाही. या दरम्यान, अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, लक्ष्मीकांत खाबिया, स्वप्निल गंगवाल, महावीर चौगुले आदी उपस्थित होते. जैन बोर्डिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी गोखले बिल्डरकडून हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचा ई-मेल द्वारे कळवण्यात आले होते. त्यानंतर आता ट्रस्टच्यावतीनेही व्यवहार रद्द करण्यासही धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वकिलांनी दिली आहे. गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार असे सांगण्यात आले.
दरम्यान मॉडेल कॉलनीतील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’मध्ये एक हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, तेथे जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे.
जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डरला ‘व्यवहार रद्द ‘ बाबत चे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
Date:

