पुणे : यंदाचे वर्ष भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सरहद संस्थेच्या पुढाकाराने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून ईशान्य भारतविषयक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आणि आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नागालँड विद्यापीठाचे कुलपती डॉ. समुद्र गुप्त कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण सोमवार दि.03 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.15 वा. गुवाहाटी, आसाम येथील ईशान्य भारत विकास परिषद गुवाहाटी येथील सभागृहात करण्यात येणार आहे.
डॉ.भूपेन हजारिका आणि सरहद संस्थेचे त्यांच्या अंतिम काळात म्हणजेच 2008 ते 2011 सलोख्याचे संबंध तयार झाले होते. संगिताच्या माध्यमातून हिंसाचाराची तीव्रता कमी करता येते आणि माणूस हा केंद्रबिंदू मानून काम करण्यासाठी काही योजना आखण्यात आल्या होत्या. मुंबई आणि महाराष्ट्राला ते कर्मभूमी मानत असत.
हजारिका यांच्या मृत्यूनंतर 2012 पासून संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या मान्यतेने ईशान्य भारतातील राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणार्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. 51,000 रूपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदा मागील पाच वर्षाचे पुरस्कार मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिजात नृत्य कलाकार लैश्राम मेमादेवी तसेच मिझोराममधील एल. आर. सायलो. अरूणाचल प्रदेश मधील प्रसिद्ध लेखक व प्रशासकीय अधिकारी येशे दोर्जी थोंगची मेघालयातील प्रसिद्ध इतिहासकार व भारतीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री प्रो. डेविड रीड सिमलीह, आसाममधील प्रसिद्ध प्रकाशक व संगीतकार तसेच आसामी साहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. सुरजा कांता हजारिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच चित्रपट निर्मात्या रजनी बासूमतारी यांना देण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभही करण्यात येणार आहे. ही माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त अनुज नहार, शैलेश वाडेकर तसेच समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि झाहीद भट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सरहद संस्थेच्या वतीने ज्योतिरादित्य शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गुवाहाटी, आसाम येथे डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ
Date:

