मुळशीतील ४५ कुटुंबांना फराळ, कपडे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
पुणे ः दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि फटाक्यांची आतषबाजी यांचा आनंद कधी फक्त दूरून पाहणाऱ्या कातकरी वस्तीत यंदा खऱ्या अर्थाने प्रकाश उतरला. शहरातील तरुणांच्या पुढाकारामुळे डोंगरदऱ्यांमधील या पाड्यावरही दिवाळीचा आनंद झळाळून उठला. पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात सहभागी झाले होते.
गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ, येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ आणि अरण्येश्वर एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जय गणेश व्यासपीठाअंतर्गत मुळशी तालुक्यातील कळमशेत भागातील कातकरी पाड्यावरील ४५ कुटुंबांना दिवाळी फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे तसेच वह्या-पुस्तके आदी साहित्य देण्यात आले. या वेळी मंडळाचे किरण सोनिवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, अमित जाधव, सुधीर ढमाले, रवी जाधव, पीयूष शहा आणि मयूर सोनावणे उपस्थित होते.
किरण सोनिवाल म्हणाले, डोंगरदऱ्यांतील या कातकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमची दिवाळीही प्रकाशमान झाली. त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा आनंद शब्दात मावणार नाही. प्रत्येकाने आपल्या आनंदाचा थोडा वाटा समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवावा, हीच खरी दिवाळी. जय गणेश व्यासपीठांतर्गत दरवर्षी वंचितांना मदत करून दिवाळी साजरी केली जाते असेही त्यांनी सांगितले.

