शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अपमान केला असल्याचे बोलले जात होते. यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा करत म्हटले की, कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, असे धंगेकर म्हणाले होते. परंतु, आमिषाला ऐवजी अमित शहा असा अपभ्रंश झाला असल्याचे उदय सामंत म्हणाले.
पुण्यातील जैन समाजाच्या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्ये जाऊन जैन समाजाचा मुद्दा ऐकून घेतला असून त्यांची भूमिका धंगेकर साहेबांना पटली आहे. काही गोष्टी गैरसमजातून घडल्या असतील तर अशा गोष्टी भविष्यात घडू नये यासाठी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मला असे वाटते की आपण सगळ्यांनी यावर पडदा टाकावा. तसेच भाजपच्या नेत्यांचा अपमान करण्याचा रवींद्र धंगेकर यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली आहे. तसेच महायुतीला बाधक होईल असे काही आमच्याकडून होणार नाही.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, शासनाने जे निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या विषयावरून कॅबिनेट बैठकीत कुठलाही वाद झाला नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, एखादी वाईट गोष्ट झाली की भाजपच्या नेत्यांना दोष देण्याचे काम ते करतात. आगामी निवडणुका पाहता त्यांचे आरोप सुरू आहेत.
आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत विधान आम्ही कुठेही पाहिले नाही, की मुंबईत युती करून लढू आणि इतर ठिकाणी युती न करता लढू. तिन्ही नेते सक्षम आहेत आणि आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार. तसेच याबाबतीत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
जे राहुल गांधी करतात ते महाराष्ट्रात होत आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत जे राहुल गांधींनी केले, तिथे एक चित्रपट दाखवला तो यांनी मागच्या रांगेत बसून बघितला. आता ते मुंबईत तेच करत आहेत. यात नावीन्य काहीच नाही. तसेच यांनी कधी यादीच पाहिली नाही, त्यांनी कधी मतदारसंघात लक्षच दिले नाही, त्यामुळे यांना ही प्रोसेसच माहीत नाही, अशी टीका सामंत यांनी केली आहे.

