केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती कठोर कारवाईची मागणी
कोथरूडमधील अभियंता मारहाण प्रकरणात पोलिसांना यश
पुणे – कुख्यात गजा मारणे टोळीचा मुख्य सदस्य रुपेश मारणे याला अखेर कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीदिनी कोथरूड परिसरात भाजपा कार्यकर्ते असलेले अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण करून तो नऊ महिन्यांपासून फरार होता. मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून गुप्त माहितीच्या आधारे त्याला जेरबंद करण्यात आले.ही घटना १९ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. शिवजयंतीनिमित्त कोथरूडमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना वाद झाला. या वादातून रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांनी जोग यांना बेदम मारहाण केली होती.
देवेंद्र जोग हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून रुपेशच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले होते, मात्र रुपेश फरार झाला होता.रुपेश मारणे हा गजा मारणे टोळीचा निकटवर्तीय असून, गजा मारणे तुरुंगात असल्याने टोळीची सर्व सूत्रे तोच हलवत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत मारहाण, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे आदी गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांच्या उपायुक्त (झोन-२) संभाजी कदम यांनी दिली.
फरारी रुपेश पोलिसांना सतत चकमा देत ठिकाण बदलत होता. त्याच्या अटकेसाठी कोथरूड पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सापळे रचले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मुळशी तालुक्यातील आंदगाव परिसरात धाड टाकत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अटकेनंतर रुपेशकडून टोळीच्या इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल असून, पुढील तपास सुरू आहे. या अटकेमुळे मारणे टोळीच्या कारवायांना लगाम बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले.

