पुणे-धनकवडीत दोन गटात एकमेकांकडे पाहण्यावरुन जोरदार धुमचक्री उडाली असून त्यात एका गटाने तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात दिलेल्या फिर्यादीत चौघांवर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अविनाश महादेव घोडके (वय ३९, रा. ठाकर गिरणीसमोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विकी बाळासो कांबळे (वय २५,रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याला अटक केली आहे. विशाल बाळासो कांबळे (वय २७) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धनकवडी येथील ठाकर गिरणीसमोर २४ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे यांचे विकी कांबळे याच्याशी शाब्दिक बाचाबाची होत असल्याचे अविनाश घोडके यांना दिसले. त्यांनी विकी कांबळे याला याबाबत विचारले असता, त्याने घोडके यांना तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली. घरी जाऊन भाऊ विशाल याला घेऊन आला. विकी याने हातातील कोयत्याने घोडके यांच्या डोक्यात, डाव्या कानावर वार केले. विशाल याने पायाच्या नडघीवर वार करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.
त्याविरोधात विकास ऊर्फ विकी बाळासो कांबळे याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश महादेव घोडके (वय ३९), ओमकार दीपक घोडके (वय २१), अविनाश घोडके यांची मेव्हणी (वय ३५) व मेव्हणीचा मुलगा अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश घोडके यांच्या मेव्हणीचा मुलगा हा विकी कांबळेकडे रागाने पहात असल्याने त्यास रागात पाहण्याचे कारण विचारले. तेव्हा अविनाश घोडके याने विकीला शिवीगाळ करुन धमकी दिली. डोक्यात, कपाळावर लोखंडी प्लेटने मारुन जखमी केले. ओमकार घोडके याने पाठीत दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. पोलीस हवालदार धोत्रे तपास करीत आहेत.

