पुणे : ऋषी बंकिमचंद्र लिखित ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीस तिथीनुसार कार्तिक शुद्ध नवमी; 31 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘वन्दे मातरम्’ गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे उद्घाटन ऋषी बंकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चॅटर्जी यांच्या हस्ते होणार आहे.
मएसो सिनिअर कॉलेज, वन्दे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समिती, पाज्चजन्य फाउंडेशन आणि जन्मदा प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गौरव महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मएसो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे होणार आहे, अशी माहिती जन्मदा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मकरंद केळकर, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, पाज्चजन्य फाउंडेशनचे सचिव समीर कुलकर्णी यांनी आज (दि. 27) पत्रकार परिषदेत दिली. वन्दे मातरम् सार्ध शती (150 वर्षे) जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
ऋषी बंकिमचंद्र यांच्या अलौकिक प्रतिभेतून ‘वन्दे मातरम्’ हे गीत कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी जन्माला आले. हे वर्ष ‘वन्दे मातरम्’च्या निर्मितीचे 150 वे वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा युद्धघोष असणाऱ्या तेजस्वी काव्याचा अभिवाचनात्मक आणि दृकश्राव्य ‘वन्दे मातरम् 150’ हा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. संहिता लेखन मिलिंद सबनीस यांचे असून दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी आहेत. संगीत अजय पराड यांनी दिले असून अभिषेक खेडकर, अवंती लोहकरे, प्रदीप फाटक अभिवाचन करणार आहेत. महेश लिमये आणि सुरेंद्र गोखले यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

