पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतील आरक्षण सोडतीची तारीख निश्चित झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.राज्य सरकारकडून अलीकडेच प्रभाग रचना अधिसूचना मंजूर झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणून आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून, सोडतीची प्रक्रिया पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने होणार आहे.

या आरक्षण सोडतीत महिलांसाठी, अनुसूचित जाती-जमातींसाठी तसेच इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. एकूण 41 प्रभागांपैकी कोणता प्रभाग कोणत्या श्रेणीत येणार, याबाबतची अधिकृत माहिती याच सोडतीत जाहीर होणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याचे, संभाव्य उमेदवाराचे आणि पक्षनिष्ठांचे लक्ष या तारखेकडे लागले आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने आरक्षणाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण, कोणत्या पक्षाला कोणत्या प्रभागात महिला उमेदवार देणे आवश्यक ठरेल किंवा कोणत्या प्रभागात अनुसूचित समाजातील प्रतिनिधी उभे राहतील, हे यावरून ठरणार आहे. परिणामी, पक्षांच्या उमेदवार निवडीची प्राथमिक समीकरणे देखील या सोडतीनंतर स्पष्ट होणार आहेत.
निवडणूक विभागाने सांगितले की, “आरक्षण सोडतीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रक्रिया राबवली जाईल.” महापालिकेच्या सभागृहात सोडतीची प्रक्रिया होईल आणि पत्रकार व नागरिकांसाठीही ती खुली असेल.
दरम्यान, पुण्यातील काही प्रभागांमध्ये लोकसंख्या आणि भौगोलिक मर्यादा यावरून नागरिकांकडून आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, राज्य शासनाने सुधारित रचना मंजूर केल्यानंतर आता आरक्षण प्रक्रियेला अंतिम रूप देण्यात येत आहे.
शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या गटांतर्गत बैठकांना सुरुवात केली आहे. संभाव्य उमेदवारांची चर्चा, गटांतील तणाव, आणि नव्या समीकरणांचा अंदाज घेत, आरक्षणानंतर लगेचच प्रचारयंत्रणा गती घेईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
पुणेकरांसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. नवीन प्रभाग रचना, वाढती लोकसंख्या आणि विविध विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर नागरिक आता पारदर्शक आणि उत्तरदायी नेतृत्वाची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे ११ नोव्हेंबरची आरक्षण सोडतीनंतर महापालिका निवडणुकीच्या आखाडा रंगणार फायनल होणार आहे.

