कायदेशीररीत्या व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही: रविंद्र धंगेकर म्हणाले
पुणे-येथील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या विक्री व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबतचा निर्णय ई-मेलद्वारे जैन ट्रस्टचे चेअरमन आणि ट्रस्टींना कळवला असून, धर्मदाय आयुक्तालयालाही याबाबत पत्र पाठवलं आहे. ई-मेलमधून त्यांनी स्पष्ट केलं आहे की, नैतिकतेच्या आणि धर्मीय भावनांचा आदर राखत ते या व्यवहारातून माघार घेत आहेत. तसेच, आधी जमा केलेले 230 कोटी रुपये परत देण्याची मागणीही गोखले यांनी केली आहे. भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या व्यवहारात अप्रत्यक्षरीत्या भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे या प्रकरणात सर्वात आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर भ्रष्टाचार आणि राजकीय दबावाचे आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.वास्तविक पाहता अशी धर्मदाय जागा कोणालाही विकत येत नाही आणि विकत घेता येत नाही आणि धर्मदाय आयुक्त देखील या जागेची व्यावहारिक विक्रीची परवानगी देऊ शकत नाहीत.त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीरच होता .हे स्पष्ट झाल्यावर आणि जैन समाजच एकवटला हे पाहिल्यावर आता बिल्डर विशाल गोखले यांनी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणात गोलमाल झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. धर्मादाय आयुक्तांनी जागा विक्रीची दिलेली परवानगी कायदेशीर नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे या आयुक्तांपासून जागा विकणारे आणि खरेदी करणारे असे तिघे आणि जागेचे खरेदीखत करणारे निबंधक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडू शकणार आहेत .

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, दोन दिवसांत जर हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला, तर मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिलेबी भरवेन. त्यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आश्वासन दिलं आहे की दोन दिवसांत या प्रकरणाचा तोडगा निघेल. त्यामुळे मी दोन दिवस काही बोलणार नाही. पण जर हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या रद्द झाला नाही, तर मी पुन्हा मैदानात उतरेन. धंगेकरांनी गोखले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटलं, विशाल गोखले फार मोठा उद्योगपती नाही. तो एकेकाळी लहान बिल्डर होता. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत त्याची प्रचंड प्रगती झाली, आणि ती काही योगायोगाने झाली नाही.
या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचाही उल्लेख धंगेकरांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, मी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला आहे की, दोन दिवस मी गप्प बसेन. ते माझे नेते आहेत आणि त्यांच्या सन्मानासाठी मी काही बोलणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी शांत बसणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग मिळाला आहे. धंगेकरांनी पुढे म्हटलं की, विशाल गोखले याने ई-मेल पाठवला असेल तरी मला अजून विश्वास बसत नाही. जोपर्यंत कायदेशीररीत्या हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. हा व्यवहार ट्रस्टींनी केला होता आणि आता तेच लोक गायब झाले आहेत. त्यांना पकडून आणणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
दरम्यान, जैन धर्मीय समाजामध्ये या निर्णयाचे मिश्र प्रतिसाद उमटले आहेत. अनेकांनी विशाल गोखले यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यवहार धार्मिक स्थळाशी संबंधित असल्याने तो श्रद्धा आणि भावनांवर घाव घालणारा होता. दुसरीकडे काही व्यावसायिक मंडळींनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचं मत व्यक्त केलं आहे. आता धर्मदाय आयुक्तालय या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करणार आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि विशाल गोखले या तिघांच्याही हालचालींवर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं आहे. दोन दिवसांच्या आत व्यवहार रद्द होतो का, की पुन्हा नव्या आरोप-प्रत्यारोपांचा फेऱ्याचा खेळ सुरू होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

