अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी येथील छटपूजा उत्सवात आशीर्वाद देणार – लालबाबू गुप्ता
पिंपरी, पुणे : गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर शनिवार पासून छटपूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम सोमवारी, (दि.२७) सायंकाळी, पाच वाजता सुरू होणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीने भव्य गंगा आरती करण्यात येणार आहे. अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजूदास महाराज हे उपस्थित राहून शुभाशीर्वाद देणार आहेत. तसेच आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजन महाराज, हिंदू आघाडी संस्थापक मिलिंद एकबोटे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत, यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी केले आहे.
कुटुंब आणि विश्वाच्या कल्याणासाठी तसेच पिक पाणी मुबलक यावे यासाठी
सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना आणि छट मातेची पूजा करून व्रत केले जाते. उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये मोठ्या भक्ती भावाने हे व्रत केले जाते. मागील अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील छटपूजा, श्री सूर्यषष्ठी महाव्रत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
मोशी येथील इंद्रायणी नदीघाट येथे भोसरी, मोशी, पिंपरी नेहरू नगर, चिंचवड़, चिंबळी, कुरुळी, कोयाळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, आकुर्डी, तळवडे, आळंदी कृष्णानगर आदी भागातून भक्त भाविक उपस्थित राहणार आहेत. यावेळी पारंपरिक पूजा करून भजन, छट लोकगीते सादर करण्यात येतील व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

