पुणे–केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आता थेट ‘केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर’ केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. धंगेकर यांनी बॉम्बे फ्लायिंग क्लबच्या थकबाकी प्रकरणात मोहोळ यांनी हस्तक्षेप करून हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटी रुपयांचे मोठे नुकसान केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे, ज्या क्लबला फायदा करून दिला, त्याच क्लबने मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार मानले जाणाऱ्या विशाल गोखले यांना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा आरोप करत, धंगेकर यांनी ‘विशाल गोखले यांच्यामार्फत कोणत्या कामाची दलाली झाली?’ असा थेट सवाल विचारला आहे.
यासंदर्भात रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले यांचा कुंभमेळाव्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रवींद्र धंगेकरांची सोशल मीडिया पोस्ट
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या बिल्डर विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही.केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री.विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे.

जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे.
नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी ₹200 कोटींची वसुली करणे अपेक्षित होते . परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे.

श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लब वर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला, त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते. यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री.विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे, हा तपासाचा विषय आहे. याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.


