आळंदीत रवींद्र धंगेकर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
पुणे- जैन बोर्डिंग भूखंडाच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते असून, त्यांना “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही,” असा सल्ला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर आहेत. आळंदी विविध सुशोभिकरणाची कामे शिंदेंच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांना पत्रकारांनी जैन बोर्डिंग भूखंड व्यवहारावरून धंगेकर आणि मोहोळ यांच्या वादावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी उपरोक्त विधान केले. दरम्यान, आळंदी येथे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मी दोन दिवसांत तोडगा काढून देतो असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी मला दिल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, हे मी रवींद्र धंगेकर यांना सांगितले आहे. आता तो विषय संपला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. रवींद्र धंगेकरांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली, त्याआधारावर ते बोललेत, असेही शिंदेनी म्हटले.आता मी त्यांना सांगितलंय की, महायुती आपली आहे. या वादातून आपल्याला विरोधकांच्या हातात कुठलही आयते कोलित द्यायचे नाही. रवींद्र धंगेकर हा काम करणारा आणि अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. माझाी भूमिका भारतीय जनता पार्टी विरोधात नसल्याचे रवींद्र धंगेकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे. आता जे काही प्रकरण सुरू होते, त्यावरही पडदा पडेल आणि हा विषय संपेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
धंगेकर म्हणाले,’ दोन दिवसांत तोडगा शिंदेंचे आश्वासन – दरम्यान, जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. तुला दोन दिवसांत तोडगा काढून देतो, असे शिंदेंनी मला सांगितले आहे. जैन मंदिर मुक्त होणार, याबाबत त्यांनी मला शाश्वती दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. कार्यकर्ता म्हणून माझी लढाई कधीच संपणार नाही. वाईट प्रवृत्तीविरोधात लढलो नाही, तर पुढील येणारी पिढी मला माफ करणार नाही, असे रवींद्र धंगेकर म्हणालेत.सर्वसामान्य पुणेकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगरसेवक ते आमदार अशा उंचीवर नेले. पण त्याने काहीच केले नाही. या पापाचा धनी मी होऊ नये, म्हणून मी कायम जनतेच्या बाजुले लढणार असल्याचे धंगेकरांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीचा शेवटचा स्वाभिमानी कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत का नसतील? असा सवालही रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय.

