जैन बोर्डिंग जागा बळकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे.
धंगेकर यांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे, कारण ही जमीन दानधर्मासाठी आहे आणि व्यावसायिक विक्री धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करते. त्यांनी मोहोळ यांच्यावर गोखले बिल्डर्सशी भागीदारी आणि धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे
पुणे :रवींद्र धंगेकर यांनी आता थेट नरेंद्र मोदींनाच पत्र लिहून मोदीसाहेब, सेल डीड रद्द तर कराच,पण मोहोळांचा राजीनामा घेऊन चौकशी करा अशी मागणी केली आहे. तसेच २७ नोव्हेंबरपासून जैन बोर्डिंग याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचेही धंगेकरानी सांगितले आहे.
धंगेकर म्हणाले आहेत की,तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे.
तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्रामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही.
त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत.त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत श्री. मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे.




धंगेकरांनी मोदींकडे काय केली मागणी?
रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या मागण्या मांडल्या आहेत. शिवाजीनगरातील ३.५ एकर जैन बोर्डिंग जमीन बेकायदेशीरपणे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली. हा व्यवहार रद्द करावा.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करून धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकला, असा आरोप आहे. निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजीनामा द्यावा.
जैन बोर्डिंग आणि इतर मंदिर व देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या टोळीवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
२७ ऑक्टोबरपासून जैन बोर्डिंग परिसरात पुणेकरांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार, जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत.

काय आहे जैन बोर्डिंग वाद
शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हीराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हाऊसची ३.५ एकर जमीन जैन ट्रस्टच्या ताब्यात आहे, जी विद्यार्थी वसतिगृह, जैन मंदिर आणि सामाजिक कार्यांसाठी वापरली जाते. डिसेंबर २०२४ मध्ये ट्रस्ट विश्वस्तांनी ही जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्याचा निर्णय घेतला, जो ८ ऑक्टोबर २०२५ रोजी २३० कोटींना अंतिम झाला.
धंगेकर यांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे, कारण ही जमीन दानधर्मासाठी आहे आणि व्यावसायिक विक्री धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करते. त्यांनी मोहोळ यांच्यावर गोखले बिल्डर्सशी भागीदारी आणि धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे

