संचालक राजेंद्र पवार यांनी घेतला पुनर्रचना अंमलबजावणीचा आढावा
पुणे, दि. २५ ऑक्टोबर, २०२५ – महावितरणने लागू केलेली सुधारित मनुष्यबळ पुनर्रचना ही ग्राहक व कर्मचारी या दोघांच्याही हिताची असून, ग्राहकांना समर्पित व चांगली सेवा देण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मासं) यांनी केले. शुक्रवारी (दि. २४) गणेशखिंड (पुणे) येथील विश्रामगृहात झालेल्या मनुष्यबळ पुनर्ररचना आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकीला पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजीव नेहते, अनिल घोगरे व सहा. महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेर्शिके यांचेसह पुणे परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते. पुणे परिमंडलात दोन आठवड्यांपासून सुधारित मनुष्यबळ पुनर्रचनेनुसार महावितरणचे कामकाज सुरु आहे. त्याचा आढावा संचालक राजेंद्र पवार यांनी घेतला.
बैठकीत दरम्यान ते म्हणाले, ‘वीज अभियंते व तांत्रिक कर्मचारी यांना वीजपुरवठा, वीजबिल वसुली अशा सर्वच कामांचा ताण होता. नविन पुनर्रचनेत सरसकट कामाचा ताण कमी करुन निवडक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. आता कामे करताना ती निश्चित स्वरुपाची व केंद्रित पध्दतीने असणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देता येईल.’
सेवेप्रती व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा- राजेंद्र पवार
पुनर्रचनेचा बदल अभियंते व कर्मचाऱ्यांनी मनापासून स्विकारावा. ग्राहकांना महावितरणकडून सेवेप्रती खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवेप्रती व्यावसायिक दृष्टीकोन बाळगणे गरजेचे असून, बदलत्या तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करावा. तसेच तक्रारींचा निपटारा वेळेत करुन वसूलीचे लक्ष शंभर टक्के गाठावे.
पुनर्रचनेत आवश्यकतेनुसार बदल करु- राजेंद्र पवार
महावितरणने पुनर्रचनेचे प्रारुप लागू करताना ते अधिक चांगले कसे राहील यावर भर दिलेला आहे. तसेच अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या त्रूटी देखील दूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी सूचना मागविण्यात येत असून, बदल सुचविताना त्याची आवश्यकता व निकड याबाबतचे स्पष्टीकरण जरुर द्यावे. जेणेकरुन पुनर्रचना अधिकाधिक ग्राहक केंद्रित होईल.

