पुणे- शरद पवारांच्या पक्षाच्या समर्थक आणि पिंपरी चिंचवड येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नकुल भोईर असं मृत व्यक्तीचं नाव असून, तो शहरात विविध सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राजकीय कार्यक्रमात सक्रिय होता.या प्रकरणातील पत्नी चैताली भोईर या आगामी महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोघांमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादातूनच चैतालीने ओढणीने गळा दाबून नकुलचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून चौकशी सुरू केली आहे.
ही घटना चिंचवड परिसरातील नकुल आणि चैताली यांच्या राहत्या घरी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरा नकुल आणि चैताली यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात चैतालीने घरातील ओढणीने पतीचा गळा दाबला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर नकुल बेशुद्ध पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन आणि पाच वर्षांची लहान मुलं शेजारच्या खोलीत झोपलेली असताना घराच्या हॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला.घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक धक्कादायक अवस्थेत आहेत.पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, नकुल भोईर पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. या संशयावरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. चैताली ही प्रकृतीने मजबूत आणि आत्मविश्वासू स्त्री असून, तिचा स्वभावही हट्टी असल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री झालेला वादही हाच मुद्दा घेऊन सुरू झाला. नकुलने पुन्हा आरोपात्मक बोलणे सुरू केले, त्यावरून संतापलेल्या चैतालीने ओढणी घेऊन नकुलचा गळा दाबला. काही क्षणांत नकुलचा श्वास थांबला. मुलं झोपेत असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांच्या मते, ही घटना पूर्णतः कौटुंबिक रागातून घडली असून, यामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नाही. तथापि, आरोपीची चौकशी सुरू आहे .
नकुल भोईर हे पिंपरी चिंचवड परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते होते. विविध समाजकारण, शिक्षण आणि नागरिकांच्या समस्यांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. चिंचवडगाव परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता आणि अनेकदा ते शासकीय यंत्रणांकडे नागरिकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत असत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी त्यांचे राजकीय संबंध होते आणि अलीकडच्या काळात ते स्थानिक निवडणुकीत सक्रिय झाले होते. त्यांच्या पत्नी चैतालीनेही नगरसेवक पदासाठी तयारी सुरू केली होती. दोघांचं हे राजकीय आणि कौटुंबिक आयुष्य एकमेकांत मिसळलं होतं; मात्र, याच नात्यातून वारंवार वाद निर्माण होत होते. त्या वादांनीच अखेर भीषण वळण घेतलं आणि नकुलचा जीव घेतला.
पोलिस तपास सुरू; स्थानिकांत संताप
चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, चैताली भोईरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, वाद नेमक्या कोणत्या कारणावरून विकोपाला गेला, याची खात्री करण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांची आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहोत. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय असल्याने आर्थिक कारणांवरूनही वाद होत असावेत, अशी शक्यता पोलिस तपासत आहेत.

