आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार:पण, कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू; उदय सामंत यांचा इशारा
मुंबई- आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये अनेक भागांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर येत आहे.पुण्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे अनेक दिवसांपासून भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नेमके काय चित्र पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.या पार्श्वभूमीवर रवी धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल असे सांगत आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीत राहूनच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांना त्रास होणार नाही. महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील. तसेच महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना मात्र बाजूला केले पाहिजे, अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.
सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे. धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत सामंत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी बालनाट्य परिषदेवर झालेल्या आरोपांवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, हा पूर्णपणे बालनाट्य परिषदेचा विषय आहे आणि ज्यांनी आरोप केले त्यांनीच आता खुलासा केला पाहिजे. तसेच संजय राऊत यांच्या राहुल गांधी पंतप्रधान वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, राहुल गांधी पंतप्रधान होणार हे दिवास्वप्न आहे. राहुल गांधी पंतप्रधान होतील असे म्हणणे म्हणजे मी ट्रम्प झालो, असेच आहे, अशी खोचक टीका सामंत यांनी केली.

