पुणे-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग भूखंड विक्री प्रकरणात आपल्यावर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. तसेच रवींद्र धंगेकर वगळता इतर कोणताही व्यक्ती माझ्यावर आरोप करत नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात माझ्यावर आरोप करणारा एकच माणूस आहे. कदाचित त्यांना चावी देणारा माणूस दुसरा कुणीतरी असेल, असे ते म्हणाले. पुण्यातील जैन बोर्डिंग वसतिगृहाची जागा शिवाजीनगर येथे आहे. ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समुदायाने केला आहे. या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हा विषय लावून धरत मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी मोहोळ यांनी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी केलेली एक व्हिडिओ जाहिरातही पोस्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी पुढे येत या प्रकरणाचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
मुरलीधर मोहोळ गुरूवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी यापूर्वीच माझी बाजू स्पष्ट केली आहे. सध्या माझ्यावर आरोप करणारा माणूस एकच आहे. मी त्याच्यावर बोलणे सोडून दिले आहे. हा व्यक्ती उठसूठ माझ्यावर आरोप करतो. या लोकांमुळे शहराचे वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी प्रथम त्यांचे कागद तपासावेत. त्यानंतर त्यांच्या मुलाखती चालवाव्यात. मी वैफल्यग्रस्त माणसांकडून काहीही अपेक्षा करत नाही. मी पुन्हा त्यावर बोलणार नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवींद्र धंगेकरांना भाजपचेच काही लोक रसद पुरवत असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारांनी याविषयी मोहोळ यांना विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. त्यांना किती सीरियस घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. मला पुन्हा – पुन्हा या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. विशाल गोखले (गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा) हा माझा मित्र होता, आहे व पुढेही राहील. त्यात बदल होणार नाही. पण त्यांनी (रवींद्र धंगेकर) 5 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ काढून मी त्यांची जाहिरात करत असल्याचा आरोप केला. तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणातील सत्यता तपासा. पडताळून पाहा. तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. पण आत्ता त्यांचाही एक व्हिडिओ समोर आला आीहे. मग त्यांच्यावरही ते त्या व्यवसायात पार्टनर असल्याचा आरोप करावा का? मला असे वाटते की, आपण त्यात पडू नये. या शहराचे नाव खराब होऊ नये. कारण, या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. कुठेतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीची वाट लावत आहे. या प्रकरणी सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. मोहोळ पुढे म्हणाले, बाणेर, बालेवाडीतील काही शेतकरी 5 वर्षांपूर्वी माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्याकडे या बिल्डरने खोटी मोजणी करून प्लॅन मंजूर केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मी त्याची माहिती काढली. तेव्हा प्रशासनाने त्यापूर्वीच त्याला स्टे दिल्याचे निष्पन्न झाले. हे काम महापालिकेचे आहे. आज मी महापालिकेत नाही. मी महापालिका सोडून 5 वर्षे झाली. त्यानंतर 3 वर्षे मी लोकप्रतिनिधीही नव्हतो. त्यानंतर वर्ष दीड वर्षांनी मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो. या प्रकरणाचे उत्तर महापालिका प्रशासन देईल. पण कुणीही उठायचे आणि काहीही आरोप करायचे हे बरोबर नाही. कदाचित यामागे चावी देणारे दुसरे कुणीतरी असेल. मी त्याकडे लक्ष देत नाही, असे ते म्हणाले. स्थानिकच्या निवडणुकीत वरिष्ठ जे सांगतील तेच होईल मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन होणार असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, आमची राज्यपातळीवर महायुती आहे. आम्ही अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वजण एकत्र आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचे नेते जो आदेश देतील त्याचे पालन आम्ही करू. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. उद्या पुण्यातही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा विचार आला तर आमच्या कोर्टात बॉल येईल. पण आता तरी राज्याचे नेते सांगतील तेच त्यामध्ये होईल.

