नवी दिल्ली-
दिवाळीपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावली आहे. गुरुवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता “खूपच खराब” राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) वेबसाइटनुसार, सकाळी ६ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३५३ नोंदवण्यात आला, ज्यामध्ये अनेक भाग “रेड झोन” मध्ये आहेत.अक्षरधाम मंदिराजवळील रस्त्यांवर दृश्यमानता कमी होती. सकाळी येथील बहुतेक भाग धुराने झाकलेले होते. दिल्लीतील बहुतेक भागात AQI 300 ते 400 पर्यंत होता, म्हणजेच हवेची गुणवत्ता “खूपच खराब” ते “गंभीर” होती.दिवाळीच्या काळात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. सध्या मुंबई शहरभर धूरकट वातावरण असून, सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 133 वर, म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत असला तरी, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तो नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘घातक’ पातळीवर पोहोचला आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, मुंबईकरांना श्वसनाचे त्रास जाणवत आहेत.मुंबईत सध्या हवामान धूसर, दृश्यमानता कमी आणि हवा प्रदूषित असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना गरज असल्याशिवाय बाहेर न पडण्याचा, मास्क वापरण्याचा आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्लीत आनंद विहारमध्ये सर्वात वाईट परिस्थिती होती, जिथे सकाळी ५:३० वाजता AQI ५११ वर पोहोचला. आरोग्य तज्ञांनी दिल्ली-एनसीआरमध्ये AQI मध्यम पातळीवर परत येईपर्यंत बाह्य क्रियाकलाप मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठ महानगरांमध्ये दिल्लीमध्ये सर्वात वाईट AQI होता.
बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये सकाळी AQI ७० पेक्षा कमी नोंदवले गेले, तर अहमदाबाद आणि मुंबईमध्ये सकाळी ११० AQI नोंदवले गेले. दरम्यान, दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाची चाचणी पुन्हा एकदा थांबली आहे. जुलैमध्ये सुरू होणारा हा प्रयोग अद्याप झालेला नाही कारण हवामान खात्याने (IMD) आवश्यक ढगाळ वातावरण नसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की ढग दिसू लागताच चाचणी ताबडतोब सुरू होईल. सर्व मंजुरी, निधी आणि विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईतील काही भागांमध्ये प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती भायखळा येथे असून, तेथे AQI 213 नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता दर्शवतो. याव्यतिरिक्त, सिद्धार्थ नगर-वरळी (204), वांद्रे हिल रोड (191), चेंबूर (187) आणि देवनार (187) यांसारख्या ठिकाणीही उच्च पातळीचे प्रदूषण नोंदवले गेले आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश नागरिक दूषित हवेत श्वास घेत आहेत.
प्रदूषणामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना अधिक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी AQI 200 च्या पुढे गेल्याने लोकांना घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यात अडचण अशा समस्या जाणवत आहेत. निरोगी व्यक्तींनाही हवेतील धूर आणि धूळकणांमुळे अस्वस्थता निर्माण होत आहे.
या वाढत्या प्रदूषणामागे अनेक घटक जबाबदार आहेत. शहरात हिवाळ्याची सुरुवात झाल्यामुळे वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषक कण हवेत स्थिर राहतात. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात सुरु असलेली बांधकाम आणि वाहतुकीमुळे धूळ व धूर वाढतो. याशिवाय दिवाळी उत्सवाच्या काळात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी, दिवाळीपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये हिरव्या फटाक्यांची विक्री आणि फोडणी करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने सांगितले की या चार दिवसांत, लोकांना सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत एकूण तीन तासांसाठीच हिरवे फटाके फोडण्याची परवानगी असेल.
तथापि, दिवाळीच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. दिवाळी आणि त्यानंतरच्या दिवशी लोकांनी फटाके फोडले. यामुळे गुरुवारी सकाळी दिल्लीत दाट धुराचे साम्राज्य निर्माण झाले. रात्रभर जोरदार फटाके फोडल्यानंतर हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये घसरली.
GRAP चे टप्पे जाणून घ्या
पहिला टप्पा ‘खराब’ (AQI २०१-३००)
दुसरा टप्पा ‘खूपच खराब’ (AQI 301-400)
तिसरा टप्पा ‘गंभीर’ (AQI ४०१-४५०)
चौथा टप्पा ‘गंभीर प्लस’ (AQI >४५०)
GRAP-I लागू, N95 किंवा डबल सर्जिकल मास्कची शिफारस
जेव्हा AQI २०० ते ३०० च्या दरम्यान असतो तेव्हा GRAP-I सक्रिय होतो. या अंतर्गत, NCR मधील सर्व संबंधित एजन्सींना २७ प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.
यामध्ये अँटी-स्मॉग गनचा वापर, पाणी शिंपडणे, रस्ते बांधकामात धूळ नियंत्रण, दुरुस्ती प्रकल्प आणि देखभाल उपक्रमांचा समावेश आहे.
गाझियाबाद येथील फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. शरद जोशी यांनी सर्वांना संरक्षणासाठी बाहेरच्या क्रियाकलापांमध्ये N95 किंवा डबल सर्जिकल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

