धंगेकरांच्यामागे भाजप सरकारमधील बडा नेता:
लक्षात ठेवा, आमच्या शिवसेनेचा पराभव म्हणजे मराठी माणसाचा पराभव-
मुंबई-मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी महायुतीचे तिघे एकत्र आले आहेत. या सर्वांचे लक्ष मुंबई आहे. बाकी इतरत्र ते एकत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणे म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणे त्याविषयी त्यांचे एकमत आहे. बाळासाहेबांचा मुंबई मनपा वरील भगवा काढण्यासाठी हे तिघे एकत्र आहेत, इतर ठिकाणी ते एकत्र नाहीत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत म्हणाले की,पुण्यात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आला आहे.मोहोळ विरुद्ध धंगेकर असे नसून भाजपमधील एक गट मोहोळाविरोधात आहे. धंगेकर हा मोहरा आहे, त्यांच्या मागे असणारे त्यांच्याच सरकारमध्ये बसलेले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, अमित शहा आणि त्यांच्या बेनामी कंपन्या हे मुंबई अदानींना देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2029 पर्यत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहतील का? 2029 पर्यत मोदी प्रधानमंत्री पदी राहु शकले तरच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहू शकतील. केंद्रात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकारणात बहुमत हे चंचल असते. महाराष्ट्रातील बहुमत हे खूप चंचल आहे. देवेंद्र फडणवीसांना अजित पवार, एकनाथ शिंदेंचा गट फोडायचा आहे. त्यांना स्वयंभू राजकारण करायचे आहे. येणाऱ्या काळात दिल्ली अस्थिर होणार आहे. फडणवीस शिंदेंचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहे.
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा इंडिया आणि महा विकास आघाडीतील मित्रपक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही. काँग्रेससोबत आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत म्हणून महा विकास आघाडी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जर कुणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना आणि सहकाऱ्यांना अडचणीत आणणारे कोणतेही विधान करणार नाही. राज ठाकरे हे मनसेप्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यामुळे जर कुणी ही भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदानींच्या धशात जाऊ द्यायची नाही ती वाचवायची आहे. या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यामध्ये अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते. हा इतिहास काँग्रेसच्या नेत्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. मुंबईसाठी सर्व मतभेद विसरत सर्व पक्ष एकत्र आले होते, त्या प्रमाणे पुन्हा एकदा तसे वातावरण निर्माण झाले आहे. बिहारमध्ये राज ठाकरे आहे का? तिथे राजद आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. हे ही नको ते ही नको असे वाक्य एक दिवसाच्या प्रसिद्धीसाठी असतात असे म्हणत राऊतांनी भाई जगताप यांना टोला लगावला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे त्यासाठी काँग्रेसमधील मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्हाला बोलायचे असेल तर आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे.
संजय राऊत म्हणाले की, आम्हाला काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता. पण नाही होऊ शकला ना? आम्ही इंडिया आघाडी केली कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते. आम्ही कधी असे म्हंटलो नाही की शिवसेनेचा किंवा इतर पक्षाचा पंतप्रधान करायचा आहे. काँग्रेस दिल्लीतील सर्वात मोठा पक्ष आहेच, त्यामुळे आमचे मन फार मोठे आहे, आम्हाला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. तुम्ही मुंबई महापौरांचे काय घेऊन बसलात.27 मनपामध्ये तुम्ही काँग्रेसचे महापौर करा. भाजपला रोखणे आणि मराठी महापौर होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यापूर्वी 30 वर्षे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर आहे त्यांचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल यात एकदा काँग्रेसने आम्हाला मदत केली हे देखील विसरता येणार नाही. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसचे नेते काय बोलतात हे महत्त्वाचे नाही. आतापर्यंत काँग्रेस आमच्यासोबत पूर्णपणे सामील झालेला आहे. वेगळा होण्याचा काही मुद्दा चर्चेला गेलेला नाही. समाजवादी पार्टीला त्यांची फार ताकद आहे असे वाटत असेल किंवा भाजपला मदत करण्याची त्यांची इच्छा असेल पण जनता आमच्यासोबत आहे.

