पुण्यात फुटणार होते सुमारे २५ नगरसेवक,ते फुटू नये म्हणून स्वबळावर …
मुंबई- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच पुण्यासारख्या शहरात नेत्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणामुळे सुमारे २५ नगरसेवक कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांनी मोजक्या पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिथे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत, तिथे आम्ही वेगळे लढू. मात्र, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. “मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजप स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत एकत्र, पण राज्यात म्हणजेच इतर महापालिकांमध्ये वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ.दरम्यान ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे तिथे भाजपा नेमकी काय भूमिका कशा पद्धतीने राबविणार याकडे लक्ष लागून राहणार आहे .
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही बंधू एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता, मुंबई महापालिकेत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा भाजपचा विचार आहे. फडणवीस यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर युतीचाच महापौर असेल, असा विश्वास व्यक्त केला.मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कसा फायदा झाला, याचे पुरावे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यावरही त्यांनी यावेळी स्पष्ट भाष्य केले. “सध्या तरी मी वर्षावरच राहणार आहे. दिल्लीत जाण्याबाबत 2029 नंतर बघू,” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दुसरीकडे, ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे मोठे वर्चस्व असल्याने युती झाल्यास संभाव्य राजकीय नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेच्या फुटीनंतरही एका नगरसेवकाचा अपवाद वगळता सर्व नगरसेवक शिंदे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिंदे गटाची ताकद मोठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर महायुतीअंतर्गत निवडणूक लढवली गेली, तर काही जागा भाजपसाठी सोडाव्या लागतील. याचा थेट फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे यांच्यासोबतच्या आजी-माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. जागावाटपात त्यांची जागा भाजपकडे गेल्यास, या इच्छुकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते.
या नाराजीतून उमेदवारी न मिळालेले अनेक इच्छुक नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडे परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही राजकीय जोखीम टाळण्यासाठी आणि ठाण्यातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, युती आणि जागावाटपाचा निर्णय पूर्णपणे एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीत झाल्याची माहिती आहे.

