व्हिडीओ प्रसारित होताच मोहोळ समर्थक चाहते अभिनेते खवळले आणि सुरु झाले कमेंट वॉर
पुणे- जैन होस्टेल आणि जैन मंदिर जमीन खरेदीचा वाद जैन मुनी आणि समाजाच्या मोर्चाने सामाजिक विषय बनविलेला असताना आता त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव घेत,ज्यांनी भाजपाला भरभरून मते दिली त्या जैन समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, यांनी जैन समाजाला त्रास दिला असा स्पष्ट आरोप करणारा व्हिडीओ जैन समाजातील ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक निलेश नवलाखा यांनी काल सोशल मिडीयात प्रसारित केला आहे. यामुळे भाजपच्या वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.एकामागे एक आता ‘व्हिक्टिम’ पुढे येतात कि काय ? असे वातावरण निर्माण होऊ पाहते आहे. कृतघ्न नेते म्हणत याचा धडा त्यांना शिकवावाच असेही या व्हिडीओत नवलाखा यांनी म्हटले आहे. तथापि मराठी चित्रपट सृष्टीतील कोथरूडच्या एका अभिनेता असलेल्या त्यांच्या चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट बॉक्स मधून जोरदार प्रहार करत मोहोळ हे आपले मित्र असल्याचे सांगत त्यांची बाजू मांडायला काल सुरुवात केली.नवलाखा यांच्यावर बेकायदा बांधकामे आणि शेतकऱ्यांना फसविल्याचे आरोप काहींनी केले आहेत तसेच काहींनी नवलाखा यांना ट्रोल करण्याचे काम ही कमेंट पाहता दिसून आले.दरम्यान यावरही नवलाखा यांनी संबधित अभिनेत्याला मोहोळ यांचे लाळघोटे म्हणत धमक्या देणे बंद करा,ढोस देऊ नका,जैन आहोत म्हणून घाबरणार नाही असेही सुनावले आहे. तर नंतर पुन्हा याच व्हिडीओ रीपोस्ट करत यावरून थेट नवलाखा यांनी मुरलीधर मोहोळ यांनाच उद्देशून असे म्हटले आहे कि,’ माझ्या ह्या पोस्टवर खासदार मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते मला जेल मधे टाकण्याची धमकी देत आहेत,माझ्यावर defamation चा गुन्हा नोंदवण्याची भाषा करत आहेत. जर Murlidhar Mohol यांना अशी भाषा आणि जैन समाजाच्या एका व्यक्तीला आणि मराठी चित्रपट निर्मात्याला ज्यांनी एक नाही मराठी सिनेमा चे तीन राष्ट्रीय पारितोषिक मराठी सिनेमा साठी घेतले आहे अशा माणसाला जर तुमचे लोकं धमकावत असतील तर तुम्हीच हे कृत्य करायला लावले आहे असे समजण्यात येईल नाहीतर त्वरित तुमच्या लोकांना समज द्या आणि ढोस धमक्या बंद करा.
काय म्हटले आहे नवलाखा यांनी या व्हिडीओत ते वाचा जसेच्या तसे….
नमस्कार जय नरेंद्र मी निलेश नवलाखा आपल्याला माहीतच आहे की मी चित्रपट निर्माता आहे, अॅक्टीव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे. मी आज आपल्या बरोबर बोलतो आहे तो जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्या मुळे मी तुमच्या बरोबर हा संवाद साधतो आहे. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कुत्याचा एक व्हिक्टिम आहे.२०२० साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला. आज दोन हजार पंचवीस आहे. तरीसुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे. त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे. पण मला अस वाटलं की हा एक अपवाद असेल. निलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते. पण जेव्हा हे जैन हॉस्टेल चा विषय रवींद्र धंगेकर यांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित Habitual offender आहेत की काय? कारण जैन हॉस्टेल मध्ये जमिनीचा व्यवहार केला. तो एक भाग आहे. परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा गहाण ठेवलं व्यवसायासाठी. असा निर्लज्जपणाचा कळस याआधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता.कुठल्याही खासदारांनी केला नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर व बरोबर आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भिमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे. आपल्याला माहीतच आहे, जे श्रीनाथ भिमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहे. किती जैनांना त्रास तिथे दिला आहे? किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात. मिळत नाही. परंतु ते भाजपचे नेते आहेत. मुरलीधर मोहोळ सुद्धा हे भाजपचे नेते आहेत. आज कुणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात. त्यांच्यावर आरोप लावले जातात. त्यांना त्रास दिला जातो. लोक बोलत नाही. पण मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललं पाहिजे. जे काही मुद्दे आहेत. रवींद्र धंगेकरांनी मांडलेल्या आहेत. माझे त्याला समर्थन आहे आणि जे काही गोष्टी या भाजपच्या नेत्यांनी हितं चालू आहे त्या भाजपला जैन समाजाने भरभरुन मतदान केलं आहे. ते मला जिथे राहतात सॅलिसबरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो, पर्वती मध्ये एक लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते यांना देतात.मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतघ्न झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे आणि याचा धडा त्यांना शिकवावा लागेल. माझे समर्थन रवी धंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहोळ असो. भिमाले असो. यांचा निषेध करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

