मुंबई-अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे महेश कोठारे यांच्या भाजप प्रेमाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.महेश कोठारे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा भक्त असल्याचे स्पष्ट् केले आहे. तेव्हापासून ते ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालच या प्रकरणी त्यांना तात्या विंचू रात्री तुमचा गळा आवळेल असा टोला हाणला होता. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत स्वतःच्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांना भाजप प्रेमाचे भरते आल्याचा दावा केला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, अभिनेते महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे ही एका अपघात प्रकरणात अडकली आहे. तिला त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठीच महेश कोठारे यांनी भाजपची स्तुती केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, महेश कोठारे एक कलाकार आहेत. ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई एका अपघात प्रकरणात अडकल्यात. तिला कसे वाचवायचे? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. भाजपवर अशी मुक्ताफळे उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही हे त्यांना ठावूक आहे. महाराष्ट्रात एक वेगळीच संस्कृती तयार होत आहे. मी या प्रकरणी नाव घेऊन कोणत्याही जातीचा अपमान करणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवले, त्यासोबतच क्रौर्यही दाखवले, असे त्या म्हणाल्या.
उर्मिला कोठारे यांच्या कारचा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भीषण अपघात झाला होता. त्यात एक मजूर ठार झाला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाणे ते घोडबंदर रस्त्यावर गत डिसेंबर महिन्यात मध्यरात्री 12.54 च्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यावेळी उर्मिला कोठारे आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात होती. तिचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवाली पोईसर मेट्रो स्थानकालगत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. तत्पूर्वी, तिने मेट्रो स्थानकालगत काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले होते. त्यापैकी सम्राटदास जितेंद्र नामक मजूर ठार झाला होता.
या अपघातात उर्मिला कोठारेही जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कार चालकाच्या रक्ताचे नमुणे घेतले होते. पण त्याने कार चालवताना मद्यपान केले होते का? हे अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप पोलिसांकडून सुरू आहे.
महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ते मी मोदी भक्त असल्याचे म्हणाले होते. तसेच मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भाजप म्हणजे आपले घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे.विशेषतः यावेळचा महापौरही येथूनच निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात खमंग चर्चा रंगली असताना त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चारही केला आहे.

