शिवाजी महाराजांनी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही, मग हे कोण चिंधीचोर ?:शनिवारवाडा प्रकरणावरून इम्तियाज जलील यांची टीका
नमाज ही श्रद्धेची गोष्ट आहे, राजकारणाची नाही–नमाज वेळ झाली म्हणून त्यांनी प्रार्थना केली
मस्तानीने सुद्धा कधी तिथे नमाज पढली असेल, तेव्हा कुणी वाद घातला नव्हता
छत्रपती संभाजीनगर – ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याच्या घटनेवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून एआयएमआयएम पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका केली आहे. मुस्लीम महिलांनी नमाज वेळ झाल्याने प्रार्थना केली, यात काय गुन्हा झाला? त्यांनी शनिवारवाड्यावर आपला दावा केला नाही. मात्र, मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांच्या जमीन घोटाळ्याचे लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उकरण्यात आले आहे, असा गंभीर आरोप जलील यांनी केला.
या संदर्भात जलील म्हणाले की, शनिवारवाड्यात आमच्या बहिणींनी नमाज पडली म्हणून एवढं मोठं वादंग निर्माण केलं जात आहे. नमाज ही श्रद्धेची गोष्ट आहे, राजकारणाची नाही. नमाज वेळ झाली म्हणून त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी कोणत्याही दगडाला रंग मारून तो आमचा आहे असं म्हटलं नाही. शिवाजी महाराजांनी कधी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही. मग हे कोण चिंधीचोर आहेत जे आता हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात भेदभावाचं विष पेरत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे आरोप केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसीच आहे की, जेव्हा स्वतःवर संकट येतं तेव्हा मुद्दा दुसरीकडे वळवायचा. भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी निरपराध महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
चिंकू-पिंकू हिंदुत्ववादी झालेत, असे म्हणत जलील यांनी भाजपच्या नेत्यांना टोलाही लगावला. नमाज पढली म्हणजे वाडा ताब्यात घेतला असा हास्यास्पद दावा करणारे लोक हे समाजात विष पसरवत आहेत. मस्तानीने सुद्धा कधी तिथे नमाज पडली असेल, तेव्हा कुणी वाद घातला नव्हता. पण आज हेतुपुरस्सर धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू आहे. मुस्लीम समाजाला चिथावणी देऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही या राजकारणाला बळी पडणार नाही, असे जलील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मुस्लीम समाजाने हे समजून घ्यायला हवे. आमच्या बहिणींनी अजान ऐकली आणि नमाज अदा केली, यात काही चूक नाही. तुम्ही सभा घेता, शिव्या देता, मग आमचीही सभा होऊ द्या. आम्हीही बोलू, आमची जीभही चालेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकारण हि घाणेरडी दलदल -माझ्या मुलाला कधीही यात ढकलणार नाही -मुंबई वगळता राज्यातील एमआयएम पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडल्याचेही जलील यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही आगामी सर्व निवडणुका लढवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला असून स्थानिक स्तरावर युतीबाबतचा निर्णय तेथील पदाधिकारी घेतील. आम्ही उमेदवारांसाठी कडक नियम तयार करत आहोत. जर कुठे दारुण पराभव झाला, तर जबाबदार नेत्याला घरचा रस्ता दाखवला जाईल. वैयक्तिक भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं, माझा मुलगा कधीही नगरसेवक, आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुकीत उतरणार नाही. हे घाणेरडं राजकारण आहे आणि मी माझ्या मुलाला यात ढकलणार नाही. काही पित्यांना वाटत असेल की त्यांचा मुलगा या दलदलीत जावा, तर तो त्यांचा निर्णय आहे, पण माझा नाही.

