पुणे: निराधार आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ, नवा पोशाख, आकाश कंदील देऊन त्यांच्यासोबत दीपोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. पहिला दिवा निराधार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर व प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे.
भवानी पेठेतील पुष्पा पचनूर सभागृहात ज्येष्ठ नागरिक, निराधार आजी-आजोबा यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, ‘मनसे’चे संघटक प्रल्हाद गवळी, मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर, संदिप महाराज जाधव, आळंदी देवस्थान, विक्रम अगरवाल, प्रल्हाद गवळी मित्र परिवाराचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाला अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत. अलिकडे मुले आई-वडिलांनाही जुमानत नाहीत. अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत घरात मुले, नातवंडे नसलेल्या, तसेच मुले संभाळत नसलेल्या आजीआजोबांचा सन्मान करून त्यांची दिवाळी गोड करून त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न सुखावणारा आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे, असे अंकुश काकडे यांनी नमूद केले.
प्रल्हाद गवळी म्हणाले, “मागील पाच वर्षापासून आजी-आजोबांसोबत पहिला दिवा हा उपक्रम राबवत आहे. वसुबारसेदिवशी गाईची पूजा करून पहिला दिवा लावला जातो. सामाजिक भान ठेवून सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी, महिला, विधवा अशा घटकांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचे दुःख कमी करण्याच्या उद्देशाने अशाच प्रकारचे विविध उपक्रम वर्षभर राबवत असतो.”

