पुणे : दिवाळीच्या आनंदसोहळ्यात समाजातील विशेष मुलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने श्रीकांत सौंदणकर यांच्या *‘पुणे–अक्कलकोट–पुणे वारी’*तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सिंधू विद्या भवन शाळेतील विशेष मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे वातावरण उत्साह, आनंद आणि भावनिक ऊर्जेने भरून गेले.कार्यक्रमास सिंधू विद्या भवनाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सूर्यवंशी, आयईसी शाळेच्या रूपा साळवी, अमृता भागवत, देवयानी बोरसे, अमित होळकर तसेच संस्थेचे सेवेकरी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या प्रयत्नांचे व कौशल्याचे कौतुक केले.
श्रीकांत सौंदणकर यांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात समाजातील विविध घटकांपर्यंत प्रेम आणि आनंद पोहोचवणारे उपक्रम आम्ही राबवतो. विशेष मुलांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. हे उपक्रमाचे चौथे वर्षे असून संस्थेकडून वर्षभर विविध सेवाभावी व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. समाजसेवेचा हा सातत्यपूर्ण धागा आता पुण्यातील अनेक शाळा आणि सामाजिक गटांपर्यंत पोहोचला आहे.
विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
सिंधू विद्या भवन शाळेतील विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आज झाले. मुलांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये जेली मेणबत्त्या, आकर्षक पणत्या, लटकन, तोरणे, टी-कोस्टर, सुबक पाकिटे, ब्रेसलेट, कानातले अशा विविध वस्तूंचा येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मुलांचा उत्साह वाढवला.

