बांगलादेशी घुसखोरी रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई-बांगलादेशातून आलेली आणि ‘ज्योती माँ’ या नावाने ओळखली जाणारी किन्नर गुरू बाबू खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बांगलादेशी घुसखोरी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील विविध शहरांतील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलिसांना थेट सूचना देऊन कारवाईची मागणी केली होती. दिवाळीच्या काळातच ही मोठी कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बाबू खान हिची मुंबई उपनगरांत बऱ्याच ठिकाणी संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले असून तिच्या नावावर जवळपास 20 घरे असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच तिचे 200 पेक्षा अधिक भक्त असल्याची माहितीही समोर आली आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ती बांगलादेशातून आलेल्यांना राहण्याची जागा पुरवायची. स्थानिक नागरिकांनी याविषयीची माहिती गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांना मिळालेली माहिती पडताळून किन्नर गुरू म्हणून ओळख असलेल्या बाबू खान हिला अटक केली. पोलिसांनी तिच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या तपासानुसार, बाबू खान उर्फ ज्योती माँ हे एक मोठे बेकायदेशीर रॅकेट चालवत होती. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेवरून ती अवैधमार्गाने बांगलादेशी नागरिकांना देशात आणायची. त्यानंतर त्यांना कोलकात्यात काही दिवस थांबवून बनावट शाळेचे दाखले, जन्म दाखले बनवले जायचे. ही बनावट कागदपत्रे तयार झाल्यावर त्यांना मुंबईत आणले जायचे आणि गोवंडी भागात आश्रय दिला जायचा.
किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘ज्योति उर्फ बाबू आयन खान आणि तिच्या एक डझन बांगलादेशी सहकाऱ्यांची आज मुंबईत शिवाजीनगर मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.’ गेल्या 30 वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे ती भारतात राहत होती आणि तिने 200 हून अधिक लोकांना भारतात अवैधपणे आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी तिच्याकडून बनावट जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले आहेत. तिच्या नावावर मुंबईत 20 पेक्षा जास्त घरे असल्याची माहिती समोर आली आहे, जी तिने भाड्याने देऊन मोठी कमाई केली. याशिवाय, तिच्यावर अपहरण आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. सध्या शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

