पुणे –बाजीराव रस्त्यावर एका व्यावसायिकाला धमकावून १ लाख ३० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी ही घटना घडवून आणली असून, याप्रकरणी खडक पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ६० वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावर इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. दिवाळीमुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते. रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून व्यावसायिक त्यांच्या शुक्रवार पेठेतील घराकडे दुचाकीवरून निघाले होते. त्यांनी व्यवसायातून जमा झालेली १ लाख ३० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती.
बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळील गल्लीतून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. घाबरलेल्या व्यावसायिकाने दुचाकीच्या डिक्कीतील रोकड चोरट्यांना दिली. त्यानंतर चोरटे भरधाव वेगाने पसार झाले.या घटनेनंतर व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाजीराव रस्ता आणि सुभाषनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे.दरम्यान, दिवाळीच्या काळात व्यापाऱ्याला लुटण्याची ही दुसरी घटना आहे.
दुचाकीस्वार व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर नुकतीच घडली, बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्याने निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांना धमकावून खिशातील ४५ हजारांची रोकड लुटली. व्यापाऱ्याने आरडाओरडा केला. दिवाळीत व्यापाऱ्यांना लूटण्यात आल्याची दुसरी घटना घडल्याने घबराट उडाली आहे.

