पुणे -महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या कठीण काळात मातंग एकता आंदोलनाने पुढाकार घेत, पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी दीपावली निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावेळी पूरग्रस्त बांधवांना मदत करणे हे कर्तव्य असल्याची भावना मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या मदत मोहिमेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. या उपक्रमात आतापर्यंत 1300 ते 1400 कुटुंबांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
या मोहिमेचा शेवटचा टप्पा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका (कपालापुरी, वडनेर) आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका (रिदोरी, तांदुळवाडी, कुर्डवाडी) येथे पार पडला. या टप्प्यात एकूण 1300 कुटुंबियांना मदत कार्य मिळाले. याअंतर्गत आजवर 2,200 ते 2,500 कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचे नियोजित कार्य पूर्ण झाले आहे.
मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अखंड सुरू होते. राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, सचिव अरुण गायकवाड, सुनील बावकर, रामभाऊ वाघमारे (जिल्हाध्यक्ष सोलापूर), अनिल गवळी (तालुका अध्यक्ष माढा), बाळासाहेब बागाव (जिल्हा उपाध्यक्ष), रणजीत कसबे (धाराशिव जिल्हा अध्यक्ष), राणा कसबे, सुनील कसबे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, प्राध्यापक दुर्योधन साठे, माजी उपसरपंच कालिदास शिरतोडे, उपाध्यक्ष माढा तालुका ज्ञानेश्वर कसबे आणि सुनील बावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला.या संपूर्ण अभियानाची संकल्पना संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे यांची होती. त्यांनी योग्य समन्वय साधून हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण केले.

