लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय कला अकादमी न्यासतर्फे रांगोळ्या काढून दिपोत्सव
पुणे : निवारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी आपल्या थरथरत्या हातांनी दिवाळीचा पहिला दिवा लावला आणि क्षणातच वृद्धाश्रमाचा सारा परिसर उजळून निघाला. केवळ प्रकाशाने नव्हे, तर ममतेच्या प्रकाशाने. त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. कोणीतरी अजूनही आपलं आहे याचा आनंद व्यक्त करीत आजी आजोबांनी उत्साहात दिवाळी सणाला सुरुवात केली.
दिवाळीचा पहिला दिवा आजी-आजोबांसोबत प्रज्वलित करत आनंद, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला. लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि राष्ट्रीय कला अकादमी न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमात हा दिपोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, दिलीप थोरात, राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, प्रिया भोंडवे, सुप्रिया मुरमुरे, मिना लकवा, अर्जुन बिराजदार आणि जयवंत मोहने, निवारा संस्थेचे विजय बेलसरे, शेखर कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमात वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी स्वतःच्या हाताने पहिला दिवा लावला. त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य हाच दिवाळीचा खरा प्रकाश होता. सहभागी कलाकारांनी सुंदर रांगोळ्या काढून परिसर सजवला आणि दिवाळीचे वातावरण अधिक सुंदर केले. फटाके आणि फुलबाजे पेटवत वृद्धांनी दिवाळीचा आनंद लुटला.
रोमा लांडे म्हणाल्या, वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवा लावणे हा सोहळा आमच्यासाठी अत्यंत आनंददायी होता. वृद्धाश्रमातील वृद्धांचे जीवन हे एकाकीपणाचे असते. त्यांच्याशी संवाद साधून आणि दिवाळी सण साजरा केल्यामुळे वृद्धांना सन्मान आणि आनंद मिळतो.

