‘गीतरामायण – भरतनाट्यम् एक नृत्यानुभव’ सादरीकरणाने रसिक भावविभोर
कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे आयोजन
पुणे : गीत रामायण म्हटले की प्रत्येक रसिकाच्या मनात दोनच नावे उमटतात ती म्हणजे कवी पद्मश्री ग. दि. माडगुळकर आणि प्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके. या दोघांच्या गीत रामायणाचे गारूड आजही मराठी रसिक मनावर अधिराज्य करत आहे. रामायणातील अनेक प्रसंग या दोघांनी आपल्या अजरामर कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. याच गीतरामायाणातील विविध प्रसंग भरतनाट्यम् नृत्याभियातून तितक्याच देखणेपणाने रसिकांसमोर साकार झाले.
निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित ‘गीतरामायण – भरतनाट्यम् एक नृत्यानुभव’या कार्यक्रमाचे. मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नृत्य आणि नाट्य सादरीकरणातून रसिकांसमोर संपूर्ण रामकथा चितारताना ‘राम जन्मला गं सखे’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘मोडू नका वचनास नाथा’,‘ नकोस नौके परत फिरु’, ‘दाटला चोहीकडे अंधार’, ‘मज आणुनी द्या हरीण अयोध्या नाथा’, ‘सेतू बांधा रे’, ‘त्रिवार जयजयकार’ आदी गीतांवर नृत्यांगनांनी विलोभनीय नृत्याविष्कार सादर केला. या सादरीकरणास रसिकांनी भरभरून दाद देत संपूर्ण रामायणाचा आनंद घेतला.
दशरथ राजाचा परिवार, श्रीराम आणि त्यांच्या बांधवांचा जन्मसोहळा, सीतास्वयंवर, श्रीरामांचे वनवास गमन, सीताहरण, सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीरामांनी वानरसेनेसह केलेले अथक प्रयत्न, रामसेतूची उभारणी, राम-रावण युद्ध आणि अखेर रावण वध अशा रामायणातील भावपूर्ण प्रसंगांच्या उत्तम सादरीकरणाने कार्यक्रम अधिकाधिक प्रभावी होत गेला.
कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन गुरू सौदामिनी राव यांचे होते तर निर्मिती अमिता गोडबोले आणि कल्पना बालाजी यांची होती.
भरतनाट्यम् नृत्य, नाट्य आणि गोष्टीरुपातून कथानक साकारत गेले. नृत्यांगनांमधील एकमेकांशी असलेला सुसंवाद, चेहऱ्यावरील हावभाव, उत्तम पदलालित्य, सुरेश वेषभूषा आणि बहारदार नृत्याविष्कारातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे संस्थापक श्रीरंग कुलकर्णी म्हणाले, या फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती रसिकांसमोर आणण्याचा मानस आहे. रसिकांनी आवर्जून या कलाकृतींचा आनंद घेत, भरभरून प्रतिसाद द्यावा.

