मंदिर बोर्डिंग यांचाही पुनर्विकास होईल …
पुणे-मॉडेल कॉलनीतील जैन समाजाच्या पब्लिक ट्रस्ट ने साडेतीन एकराच्या जागेच्या केलेल्या कायदेशीर व्यवहाराबाबत धार्मिक हस्तक्षेप करून जैन समाजाच्या भावना भडकावून ब्लॅकमेलिंगचा प्रकार राबविला जात असल्याचा खुलासा कम आरोप हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट चे चेर्मान चकोर दोषी यांनी काल ‘ठराविक’माध्यमांना पाठविलेल्या एका प्रेस रिलीज द्वारे केला आहे.यात त्यांनी असे म्हटले आहे कि,’अॅड. योगेश पांडे तसेच असोसिएशन ऑफ एस. एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) मधील संबंधित तथाकथित व्यक्ती या जैन समाजातील लोकांच्या भावना भडकावून सदर प्रकरणास जाणिवपूर्वक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सर्व प्रकार हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. अॅड. योगेश पांडे व राजु शेट्टी यांचा न्यासाशी कोणताही संबंध नसताना देखील सुरूवातीपासून आजतागायत ते आमची जनसामांन्यात जाणीवपुर्वक बदनामी करीत आहेत.आमचेवर केलेले सर्व आरोप हे चुकीचे व गैरहेतूने केलेले आहेत.आमचे बाबत खोट्या बातम्या पसरवून व लोकांसमोर वस्तुस्थिती न ठेवता, आमचे विरूध्द जैन समाजातील लोकांच्या भावना भडकविण्यात आल्या.न्यासाने संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच न्यासाची मिळकत मा. धर्मादाय आयुक्त यांची रितसर पूर्वपरवानगी घेवून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मे गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना खरेदी दिलेली आहेसेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची मालमत्ता विक्रीचा निर्णय हा कोणत्याही व्यक्तीगत फायद्यासाठी नसून ट्रस्टच्या हितासाठी व ट्रस्टच्या भविष्यात राबविण्यात येणा-या उददेशांसाठी घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी न्यासाच्या विश्वस्तांमार्फत समाजहिताचे निर्णय घेतले गेलेले असुन ट्रस्टमार्फत आजतागायत समाजाची सेवा केली जात आहे. खरेतर न्यासाच्या मिळकतीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा न्यासाला हक्क व अधिकार आहे.सदर ठिकाणी असलेले मंदीर पाडणार आहोत. सदर बाब ही खोटी असुन फक्त लोकांच्या भावना भडकविण्यासाठी अशा प्रकारे वेळोवेळी खोटी विधाने जाणीवपुर्वक समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात आली. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की, न्यासामार्फत ते आहे त्याच ठिकाणी आहे त्या स्थितीत ठेवले जाईल व त्यात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा हस्तक्षेप होणार नाही हॉस्टेल पाडण्यात येवून समाजातील गोर-गरीब तसेच या ठिकाणी शिक्षणाकरिता येणारे विद्यार्थ्यांना हॉस्टेल सुविधेपासून वंचित ठेवण्यात येईल असे देखील समाज माध्यमांवर ठराविक व्यक्तींनी खोटी विधाने करण्यास सुरूवात केली. हॉस्टेलच्या एकुण बांधकाम क्षेत्रापेक्षा सुमारे २.८ पट जास्त क्षेत्र असलेले हॉस्टेल मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी त्यांचे खर्चाने न्यासास बांधून देणार आहेत.प्रार्थनास्थळ पाडण्याचा आमचा कोणताही उद्देष नाही. याउलट हॉस्टेलचे बांधकाम देखील आम्ही आधीपेक्षा जास्त करून घेणार आहोत.
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट सत्य स्थितीचा जाहीर खुलासा
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या न्यासाची स्थापना सन १९५८ साली श्री गुलाबचंद हिराचंद व श्री लालचंद हिराचंद यांचेमार्फत मुख्यत्वे गरीब व गरजूंकरिता वसतीगृह व शैक्षणिक सोयी कोणत्याही विशिष्ट धार्मिक समुदायासाठी मर्यादित न ठेवता सर्वाना उपलब्ध करून देणे या उददेशाने करण्यात आली होती.
सदर उददेशास अनुसरून दि. २९/०७/१९५८ रोजी नोंदणीकृत खरेदीखताने श्री. मोतीचंद गौतमचंद शहा यांचेकडून न्यासाने मॉडेल कॉलनी, भांबुर्डा शिवाजीनगर, पुणे येथील मालमत्तेची खरेदी केलेली असून त्याबाबतचे खरेदीखत मे. दुय्यम निबंधक, हवेली नं. २, पुणे यांचे कचेरीत अनु. क. ८७१/१९५८ वर रितसर नोंदविलेले आहे. सदर जमीन मिळकतीवर हॉस्टेल व अनुषंगिक इमारतींचे स्वरुपात बांधकाम करण्यात आलेले आहे.
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची मालमत्ता विक्रीचा निर्णय हा कोणत्याही व्यक्तीगत फायद्यासाठी नसून ट्रस्टच्या हितासाठी व ट्रस्टच्या भविष्यात राबविण्यात येणा-या उददेशांसाठी घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी न्यासाच्या विश्वस्तांमार्फत समाजहिताचे निर्णय घेतले गेलेले असुन ट्रस्टमार्फत आजतागायत समाजाची सेवा केली जात आहे. खरेतर न्यासाच्या मिळकतीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा न्यासाला हक्क व अधिकार आहे. परंतु अप्रत्यक्ष धार्मिक हस्तक्षेपामुळे आम्हांस प्रचंड मानसिक त्रास झालेला असुन काही व्यक्तींनी आमच्या भावना समजावून न घेता, काही विशिष्ट हेतूने प्रेरित होवून आमचेवर नाहक बदनामीकारक आरोप केलेले आहेत.
न्यासाच्या घटनेप्रमाणे असणारे मुख्य उददेश व इतर उददेश याला सदर व्यवहारामुळे कोणत्याही प्रकारे बाधा निर्माण होत नसून उलटपक्षी न्यासाच्या उददेशास अनुसरूनच न्यासाच्या हिताकरिता सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत.
आमचेवर केलेले सर्व आरोप हे चुकीचे व गैरहेतूने केलेले आहेत. न्यासाने संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच न्यासाची मिळकत मा. धर्मादाय आयुक्त यांची रितसर पूर्वपरवानगी घेवून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मे गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना खरेदी दिलेली आहे.
न्यासाने यासंदर्भात रितसर विश्वस्त मंडळाची सभा घेवून दि. १६/१२/२०२४ रोजी न्यासाच्या मॉडेल कॉलनी, भांबुर्डा शिवाजीनगर, पुणे येथील मालमत्तेच्या विकीसंदर्भातील ठराव मंजुर केलेले आहेत. या संदर्भात ट्रस्टने नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांमार्फत न्यासाने दि. २०/१२/२०२४ रोजी ४ वर्तमानपत्रात म्हणजेच दै. प्रभात, दै. पुढारी, दै. फायनान्शियल एक्सप्रेस पुणे व दै. बिझनेस स्टॅण्डर्ड मुंबई या वर्तमानपत्रांमध्ये निविदांबाबत (टेंडरबाबत) रितसर जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहीर नोटिसीप्रमाणे ज्या कोणास न्यासाची मिळकत खरेदी करण्याची आहे त्यांनी ३० दिवसांच्या आत निविदा (टेंडर) भरणे आवश्यक होते. सदर निविदा स्वीकारण्याचा शेवटवा दिवस हा दि. २०/०१/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत होता. सबब, सदर निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रत्येकास संधी देण्यात आलेली होती.
सदर जाहीर नोटिसीस अनुसरून मे गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी व इतर अनेक विकसकांनी न्यासाकडे निविदा (टेंडर) भरलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आलेल्या निविदांची न्यासाने नेमलेले प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्स्लटन्ट) म्हणजेच मेरिट रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी सखोल तपासणी केली. विश्वस्त मंडळाने केलेल्या चर्चेस अनुसरून तसेच प्रकल्प सल्लागारांनी केलेल्या तपासणी या सर्व बाबींचा विचार करून मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांनी भरलेली निविदा ही सर्वात जास्त तसेच योग्य व वाजवी असल्याने न्यासाने त्यांचे दि. २७/०१/२०२५ रोजीच्या ठरावाने त्यांची निविदा मान्य करून ती स्वीकारली. त्यानंतर न्यासाने मा. धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेण्याच्या अटीस अधिन राहून दि. २८/०१/२०२५ रोजी निविदा स्वीकारत असलेबाबत मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना रितसर पत्र दिलेले आहे.
तदअनुषंगाने न्यासाने दि. १३/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ३६ (१) चे तरतुदीनुसार मा. धर्मादाय आयुक्त यांचेकडे विक्री परवानगीकरिता रितसर अर्ज दाखल केला होता. न्यासाने दाखल केलेल्या अर्जाची योग्य ती चौकशी करून मा. धर्मादाय आयुक्त यांनी दि. ०४/०४/२०२५ रोजी आदेश पारीत करून न्यासाच्या मालमत्तेची विक्री रुपये २३० कोटी व १०,००० चौ फु. जागेवर ५२,००० चौ. फु. चे सर्व सोयीसुविधांयुक्त हॉस्टेल या मोबदल्यावर काही अटी व शर्तीसह मे. गोखले लँडमार्क्स एल एल पी यांना करण्यास परवानगी दिली.
सदर परवानगीस अनुसरून न्यासाने में, गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना दि. १५/०५/२०२५ रोजी मिळकतीचे साठेखत लिहुन दिलेले आहे. सदर साठेखतास अनुसरून व मा. धर्मादाय आयुक्त यांचे परवानगीस अनुसरून, गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांनी न्यासाला आजपर्यंत संपूर्ण मोबदला रक्कम अदा केलली आहेत. त्यानंतरच न्यासाने मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांचे लाभात दि. ०८/१०/२०२५ रोजी नोंदणीकृत खरेदीखत केलेले आहे
सबब, साधारणतः संपूर्ण निविदा प्रक्रिया तसेच त्याअनुषंगाने घेण्यात आलेली मा. धर्मादाय आयुक्त यांची परवानगी याकरिता एकूण ७-८ महिन्यांचा कालावधी लागला. सदर प्रक्रियेदरम्यान न्यासाने दि. २०/१२/२०२४ रोजी दोन मराठी व दोन इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये रितसर जाहिर नोटिसा प्रसिध्द केलेल्या आहेत. तसेच दि. १५/०५/२०२५ रोजीचे साठेखत व दि. ०८/१०/२०२५ रोजीचे खरेदीखत हे मे. दुय्यम निबंधक हवेली यांचे कचेरीत रितसर नोंदविण्यात आलेले आहे. सबब, या सर्व बाबी, सार्वजनिक कार्यक्षेत्रात (पब्लिक डोमेन) येत असल्याने त्याबाबत्त सर्वांना रितसर माहिती होती. असे असतानादेखील या सर्व प्रक्रियेस आजतागायत कोणीही कोणत्याही स्वरूपाची हरकत नोंदविलेली नाही. सबब, या सर्व बाबी, सार्वजनिक कार्यक्षेत्रात (पब्लिक डोमेन) येत असल्याने त्याबाबत सर्वांना रितसर माहिती होती. असे असतानादेखील या सर्व प्रक्रियेस आजतागायत कोणीही कोणत्याही स्वरूपाची हरकत नोंदविलेली नाही.
दरम्यानच्या काळात ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर काही व्यक्तींमार्फत या सर्व प्रकरणास वेगळे वळण लावण्यात आले संबंधित व्यक्तींनी अॅड. योगेश पांडे व श्री राजु शेटटी यांना सर्वप्रथम हातास धरून, आम्हास नोटिसा पाठवून आमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदर दबावास आम्ही बळी न पडल्याने त्यानंतर आम्हास मिळालेल्या माहितीनुसार असोसिएशन ऑफ एस.एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा)या कंपनीची स्थापना माहे जुलै २०२५ मध्ये करण्यात आलेल्या कंपनीच्या माध्यमातून आमचे बाबत खोट्या बातम्या पसरवून व लोकांसमोर वस्तुस्थिती न ठेवता, आमचे विरूध्द जैन समाजातील लोकांच्या भावना भडकविण्यात आल्या.
सर्वप्रथम लोकांना असे सांगण्यात आले की, सदर ठिकाणी असलेले मंदीर पाडणार आहोत. सदर बाब ही खोटी असुन फक्त लोकांच्या भावना भडकविण्यासाठी अशा प्रकारे वेळोवेळी खोटी विधाने जाणीवपुर्वक समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात आली. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की, न्यासामार्फत ते आहे त्याच ठिकाणी आहे त्या स्थितीत ठेवले जाईल व त्यात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा हस्तक्षेप होणार नाही असे याआधीच संबंधित लोकांना सांगितलेले होते. तसेच त्याबाबत आम्ही दि. १५/०५/२०२५ रोजीच्या साठेखतामध्ये कलम ५ (जी २) व दि. ०८/१०/२०२५ रोजीच्या खरेदीखतामध्ये कलम ३ यांत रितसर व स्पष्ट तरतुद केलेली आहे.
खरी परिस्थिती अशी आहे की, याआधी असलेल्या हॉस्टेलच्या एकुण बांधकाम क्षेत्रापेक्षा सुमारे २.८ पट जास्त क्षेत्र असलेले हॉस्टेल मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी त्यांचे खचनि न्यासास बांधून देणार आहेत. (सध्याचे हॉस्टेल अंदाजे १८,२०० चौ. फु. नव्याने मिळणारे हॉस्टेल अंदाजे ५२,००० चौ. फु.) परंतु लोकांना असे सांगण्यात आले की, सदर ठिकाणी असलेले हॉस्टेल पाडण्यात येवून समाजातील गोर-गरीब तसेच या ठिकाणी शिक्षणाकरिता येणारे विद्यार्थ्यांना हॉस्टेल सुविधेपासून वंचित ठेवण्यात येईल असे देखील समाज माध्यमांवर ठराविक व्यक्तींनी खोटी विधाने करण्यास सुरूवात केली.
इथे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की प्रार्थनास्थळ पाडण्याचा आमचा कोणताही उद्देष नाही. याउलट हॉस्टेलचे बांधकाम देखील आम्ही आधीपेक्षा जास्त करून घेणार आहोत. तसेच मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांनी याशिवाय न्यासाला रक्कम रू. २३० कोटी अदा केलेले आहेत. या सर्व बाबी जैन धर्मातील संबंधित लोकांपासुन जाणीवपुर्वक लपविण्यात येवून त्या बाबींचा जाणीवपुर्वक खोटी विधाने करून विपर्यास करण्यात येत आहे. सदर रक्कम रू. २३० कोटींवर येणाऱ्या व्याजाच्या रक्कमेचा विनियोग देखील न्यासाच्या उद्देशाकरिताच केला जाणार आहे.
कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा आमचा कधीही उद्देश नव्हता व नाही. तसेच हॉस्टेलची सुविधा देखील बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही. असे असताना देखील अॅड. योगेश पांडे तसेच असोसिएशन ऑफ एस. एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) मधील संबंधित तथाकथित व्यक्ती या जैन समाजातील लोकांच्या भावना भडकावून सदर प्रकरणास जाणिवपूर्वक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सर्व प्रकार हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. अॅड. योगेश पांडे व राजु शेट्टी यांचा न्यासाशी कोणताही संबंध नसताना देखील सुरूवातीपासून आजतागायत ते आमची जनसामांन्यात जाणीवपुर्वक बदनामी करीत आहेत.
तथाकथित असोसिएशन ऑफ एस. एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा), यांनी मा. उच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका क्र. १२८६९/२०२५ दाखल केलेली आहे. सदर याचिका प्रलंबित आहे. सदर याचिकेमध्ये सदर कंपनी ने मा. उच्च न्यायालयाकडुन अंतरिम मनाईचे आदेश देणेबाबत विनंती केलेली होती. परंतु मा. उच्च न्यायालयाने असे कोणतेही मनाईचे आदेश पारित केलेले नाहीत. असे असताना देखील समाजमाध्यमांवर असे मनाईचे आदेश पारित केलेले आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न चालू असुन त्या नावाखाली सदर अॅड. योगेश पांडे तसेच असोसिएशन ऑफ एस.एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) यांचे तथाकथित संचालक हे तमाम जैन समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्याबाबत आम्ही आमचे वकीलांचे सल्ल्याने योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत.
सदर अॅड. योगेश पांडे व असोसिएशन ऑफ एस.एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) मधील संबंधित संचालक लोकांमध्ये गैरसमज पसरवून समाजामध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे.
सबब, आम्ही कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार केलेला नसून यासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली आहे. तरी कोणीही आमचेबाबत गैरसमज करून घेवू नये.
सत्यपरिस्थिती आपणास अवगत व्हावी याकरिता हे निवेदन.
श्री. चकोर एल दोशी
चेअरमन
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट






