पुणे : पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्वाती महेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा आज (शुक्रवारी) केली.
स्वाती शिंदे काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. पक्षाची आंदोलने, बैठका, मेळावे अशा सर्व उपक्रमात त्यांनी भाग घेतला आहे. महिलांच्या कौटुंबिक समस्यांचे निराकरण करणे, महिलांसाठी अल्प खर्चात सहली आयोजित करणे, आरोग्य शिबीर भरविले. महिला बचतगटांमार्फत गरजूंना रोजगार मिळवून देणे आदी कामांमध्ये स्वाती शिंदे अग्रेसर राहिल्या आहेत. पक्षाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्या परिचित असून, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसपद त्यांनी भूषविले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, महिला संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेईन. पक्षाच्या आदरणीय नेत्या खासदार श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुनजी खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार काम करेन. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी मला संधी दिली याबद्दल मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया स्वाती शिंदे यांनी निवडीनंतर व्यक्त केली.


