पुणे-पुण्यातील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन समाजाने गंभीर आरोप केले आहेत. जैन बोर्डिंग हाऊसची जमीन ज्या बढेकर बिल्डर्स आणि गोखले बिल्डरला विकण्यात आली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासोबतच्या दोन बिल्डरांनी जैन बोर्डिंगची जागा हडप केल्याचा आरोप जैन समाजाचे गुरु , समाजाचे असंख्य लोक आणि राजकीय नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. याप्रकरणी जैन समाजही प्रचंड आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालत जैन समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या जमीन विक्री व्यवहाराला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. जैन समाजाने केलेल्या आरोपांबाबत अद्याप मुरलीधर मोहोळ यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरुन आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात जैन समाजाच्या होस्टेलची जागा हडपली गेल्याने जैन समाजाने मोठा मोर्चा काढला आहे. दोन तीन लोकांचा नफा महत्वाचा की जैन समाजाच्या भावना महत्वाच्या हे सरकारला ठरवावेच लागेल. तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचं कळतंय. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशासाठी जैन मंदिरही गिळंकृत केले, अशी खरमरीत टीका रोहित पवार यांनी केली आहे.
जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकण्याच्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा हात आहे. बिल्डर आणि मुरलीधर मोहोळ यांनी मिळून ही जागा विकली. या प्रकरणात जो जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे आश्वासन देऊनही राजू शेट्टी हे आक्रमक पावित्र्यात आहेत. आम्हाला असली आश्वासनं नकोत. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यावरच आम्ही विश्वास ठेवू. तोपर्यंत आमचा लढा हा सुरुच राहील. दिवाळीनंतर या जमीनविक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावे. आम्ही त्यांचा सत्कार करु, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

