“बारबाडोस दौऱ्याची यशस्वी सांगता”
बार्बाडोस, : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या (Commonwealth Parliamentary Association – CPA) 68 व्या जागतिक अधिवेशनाचा बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झाला. या अधिवेशनात जगभरातील २० पेक्षा अधिक देशांतील संसद सदस्य आणि सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत भारतीय लोकशाही, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेचा संदेश ठळकपणे मांडला.
अधिवेशनाच्या प्रारंभी “Parliaments since Beijing +30: Progress, Challenges and the Road Ahead for Gender Equality” या विषयावर डॉ. गोऱ्हे यांनी ओपनिंग रिमार्क्स सादर करत महिलांच्या सक्षमीकरणाबाबत भारताने आणि विशेषतः महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला.
त्या म्हणाल्या, “बीजिंग विश्वसंमेलनानंतर महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने झालेली प्रगती आणि त्यातील आव्हाने ओळखून पुढील वाटचाल ठरवणे गरजेचे आहे. भारत आणि महाराष्ट्राने लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवण्याची जगाला दिशा दाखवली आहे.”
अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात दिव्यांग नागरिकांच्या सहभाग आणि समानतेच्या हक्कांवर चर्चा झाली. डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले की, “एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा प्रत्येक घटक — विशेषतः दिव्यांग नागरिक — सन्मानाने आणि समानतेने सहभाग घेतात.” तसेच, त्यांनी महिलांविरुद्ध हिंसा आणि भेदभावाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे (Zero Tolerance) धोरण राबविण्याची गरज अधोरेखित केली आणि अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
या अधिवेशनात डॉ. गोऱ्हे यांनी विविध देशांतील संसद सदस्यांशी संवाद साधत लिंग समानता, महिला आरक्षण, लोकशाही सुदृढीकरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबत विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया मोटली, राष्ट्राध्यक्ष श्रीमती सॅंड्रा मेसन, तसेच साऊथ वेल्सच्या खासदार नताशा अशगर, त्रिनिदाद व टोबॅगोचे सिनेट अध्यक्ष वेड स्टिफन मार्क, आणि आयल ऑफ मॅन प्रदेशाचे अध्यक्ष जुआन वॉटरसन एसएचके यांच्याशी फलदायी चर्चा केली.
या परिषदेत सहभागी होणे हा एक “प्रेरणादायी आणि शिक्षणदायी अनुभव” असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विविध देशांतील प्रतिनिधींशी संवादातून मिळालेली दृष्टी आगामी कार्यात उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय लोकशाही मूल्ये आणि महिला नेतृत्वाची विचारधारा जागतिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवणारा हा दौरा ठरला. या यशस्वी सहभागामुळे महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय संसदीय व्यासपीठावर अधिक उज्ज्वल झाले आहे.

