पुणे, दि. 16 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यातील सर्व गोशाळा संचालक, शेतकरी, पशुपालक आणि गोपालक बांधवांना वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
गोमातेचे दैनंदिन जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखून शासनाने “गोमातेला राज्य मातेचा” दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदा दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वसुबारस या सणाने दीपोत्सवाला प्रारंभ होत आहे. हा दिवस कृषी आणि पशुपालन संस्कृतीशी घट्टपणे जोडलेला असल्याने तो मोठ्या श्रद्धेने साजरा करणे हे प्रत्येक शेतकरी व गोपालकाचे कर्तव्य असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.
वसुबारस सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांमध्ये व्याख्याने, गोपूजन, शाळांमधील चित्रकला स्पर्धा, “सेल्फी विथ राज्यमाता” अशा कार्यक्रमांचा समावेश करावा .
या उपक्रमांच्या आयोजनात सर्व गोशाळा संचालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, जेणेकरून कृषी व गोसंस्कृतीला सक्रिय चालना मिळेल, असेही आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आयोजित कार्यक्रमांचा अहवाल व छायाचित्रे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या ई-मेल mhgosevaayog@gmail.com वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000

