अनधिकृत स्टॉलला विरोध करा …फटाक्यांपासून सावधान …!
सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन
शहरभर अग्निशमन दलाची जनजागृती मोहीम सुरूः फटाके विक्रेत्यांनाही सूचना
पुणे-दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. परंतु या सणात निष्काळजीपणे फटाके फोडल्यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. २०२१ मध्ये २१, २०२२ मध्ये १९, २०२३ मध्ये ३५ आणि २०२४ मध्ये तब्बल ६० फटाक्यांशी संबंधित आग लागण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम” सुरू केली आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांमध्ये सुरक्षितते बाबत जागरूकता निर्माण करणे आणि आग अपघातांना आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत आहेत व मेगा फोनद्वारे जन जागृती संदेश दिले जात आहेत.
देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दिवाळी चा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा आहे. निष्काळजीपणा टाळला तर प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद राहील. आम्ही ही दिवाळी ‘सुरक्षित दिवाळी’ म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा ठेवतो.”
अग्निशमन विभागाचे नागरिकांना मार्गदर्शन :
१) फटाके नेहमी मोकळ्या जागेतच फोडावेत. गर्दीच्या भागात, इमारती जवळ किंवा वाहनां जवळ फटाके फोडू नयेत.
२) लहान मुलांना एकटे फटाके फोडू देऊ नयेत. त्यांच्या जवळ मोठ्यांचा देखरेख आवश्यक आहे.
३) फटाके हातात धरून पेटवू नयेत. अर्धवट फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
४) नायलॉन वाले कपडे वापरू नयेत; सूती कपडे वापरावेत.
५) पेटते दिवे, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या फटाक्यांच्या जवळ ठेवू नयेत.
६) फटाके फोडताना किमान पाच मीटर अंतरा वर उभे राहावे.
७) ज्वलनशील द्रव्ये, गॅस सिलिंडर, वाहनं वा विजेच्या तारा यांच्या जवळ फटाके फोडू नयेत.
८) फटाक्यांचा साठा घरात, वाहनात किंवा तळमजल्यात ठेवू नये. विक्रेत्यांनी साठा ठेवताना अग्निशमन परवानगी घेणे आवश्यक आहे.
९) फटाके विक्री केंद्रात अग्निशामक यंत्र (fire extinguisher) ठेवणे बंधनकारक आहे.
१०) प्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो “ग्रीन फटाके” वापरावेत.
११) फटाके संपल्यावर परिसरस्वच्छ ठेवावा.
१२) आग लागल्यास तत्काळ पाण्याने वा वाळू ने आग विझवावी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
अग्निशमन दलाची विशेष तयारी :
शहरातील सर्व 23 अग्निशमन केंद्रे आणि पथके २४४७ सतर्क असून या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत.
फटाके स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत जन जागृती करत आहेत.
नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असून अधिकारी नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणार आहेत.फटाके विक्रेत्यांना आणि नागरिकांना लेखी व मौखिक सूचना देण्यात येत आहेत.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचे नागरिकांना आवाहन :
“दिवाळी सणाचा आनंद सुरक्षितते सोबत साजरा करावा, निष्काळजी पणा टाळा, मुलांवर लक्ष ठेवा आणि पर्यावरण पूरक फटाके वापरा. कुठेही आग लागल्यास विलंब न लावता लगेच अग्निशमन विभागाशी दूरध्वनी १०१ या क्रमांक किंवा आपल्या नजीकच्या अग्रिशमन केंद्राशी संपर्क साधा. आनंदी दिवाळी सुरक्षितपणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
आपत्कालीन संपर्क क्रमांक:
१०१/०२०-२६४५१७०७/९६८९९३५५५६

