पुणे – सायबर चोरट्यांनी अटक करण्याची भीती दाखवून एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला ९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. ‘नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने ५३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्यात तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. तुमच्या बँक खात्याची तपासणी करायची आहे आणि या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाईल,’ अशी भीती त्यांना दाखवण्यात आली.
या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ८० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता, त्यांना संशय आला. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

