पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना शहरातील गल्लीबोळांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पाठवलेल्या पत्रात, मुख्य रस्त्यांसोबतच दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आणि कामगारवर्ग रोज वापरत असलेल्या उपरस्त्यांचीही दुरवस्था लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.
खर्डेकर यांनी नमूद केले की, पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्ग गुळगुळीत करण्याची तयारी सुरू असली तरी कर नियमित भरणाऱ्या सामान्य पुणेकरांच्या वापरातील गल्लीबोळांकडे दुर्लक्ष होते आहे. मॉन्सून परतल्यानंतर रस्ते दुरुस्तीला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे खड्डेमुक्ती आणि डांबरीकरण तातडीने सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे.पत्रात पुढे सांगितले आहे की, शहरात खड्डेयुक्त व असमतोल रस्त्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी-मानदुखीचा त्रास वाढतो आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज झाकणं रस्त्याच्या समपातळीला नसल्याने अपघातांचा धोका निर्माण होतो. क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे असलेल्या रस्त्यांची यादी तत्काळ तयार करून, त्या रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार याची सार्वजनिक माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

