पुणे-पुण्यामध्ये न्याय व्यवस्थेतील विलंबामुळे हतबल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेली तब्बल 27 वर्षे कोर्टात खटला सुरू असतानाही न्याय मिळत नसल्याने नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव यांचा जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला वाद पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित होता. इतक्या दीर्घकाळ खटला चालूनही कोणताही निकाल लागत नसल्यामुळे ते अत्यंत निराश झाले होते. आज सकाळी (दि. 15 ऑक्टोबर) नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते. काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्याय मिळण्यास होत असलेला विलंब आणि खटला दीर्घकाळ चालल्यामुळे जाधव मानसिक तणावाखाली होते. 27 वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येपूर्वी जाधव यांनी कोणती सुसाइड नोट लिहिली आहे का? याचाही शोध घेत आहेत.

