मुंबई-आमच्यावर लोकशाहीच्या नावाने जर हुकूमशाही गाजवणार असतील तर ती आम्ही काही गाजवू देणार नाही.आम्ही दोन्ही आयुक्तांची काल भेट घेतली राज्य निवडणूक आयुक्त केंद्राकडे बोट दाखवतात तर केंद्राचे राज्य निवडणूक आयोगाकडे नेमकी याची जबाबदारी कुणाची आहे, यांचा बाप कोण आहे? का केवळ निवडणूक घ्यायची म्हणून घ्यायची,असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना निवडणुका जाहीर करून टाकल्या.आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की मतदार यादीमधील घोळ सुधारत नाही तोपर्यत निवडणुका होता कामा नये. सर्वोच्च न्यायालय कधीच म्हणणार नाही की काही दोष असेल तरीही निवडणूक घ्या म्हणून. सत्ताधाऱ्यांच्या चोर वाटा आम्ही आता अडवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जे मतदार आहेत पण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट ठेवणार नाही म्हणजे काहीच पुरावे हे ठेवणार नाही. तिथले जर सीसीटीव्ही फुटेज मागितले तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचे नाही. मतदार याद्यांमध्ये घोळ घालून ठेवायचा. लोकशाही जर हुकूमशाहीच्या पद्धतीने चालवणार असाल तर आम्ही तसे होऊ देणार नाही.
लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही सर्व जण एकत्र येत असताना भाजपला देखील पत्र दिले होते पण निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी भाजपकडून कोणीही आले नाही, हा विषय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून सर्वांच्या लक्षात आला आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या 1 महिन्यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहले होते. भाजपचे लोकं मतदार यादीशी खेळत आहेत त्यांना हवे त्यांची नावे ॲड करत आहेत आणि नको असलेली नावे काढून टाकत आहेत. हा सर्व खेळ भाजपचा सुरू आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे, ही यादी आम्ही काही घरी तयार केली नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच व्यक्तीचे नाव 4 ठिकाणच्या मतदार यादीमध्ये आहे. एकाच ठिकाणी 200 मतदार दाखवण्यात आले आहेत. निवडणूक ही निःपक्षपाती घ्यायची असेल तरी घ्या नाही तर निवडणुकीपेक्षा सिलेक्शन करत मोकळे व्हा..निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलताना लक्षात आले की यांच्याकडे आयुक्त म्हणून
काही अधिकार आहेत का आम्ही केवळ नामधारी लोकांशी बोलत आहोत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 1 जुलै नंतर ज्यांना 18 वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना मतदानाचा हक्क ना हा कुठला अधिकार आहे.हे सर्व पाहिले की वाटतं ज्या प्रमाणे काही पक्षी, प्राण्याच्या केसेस सुमोटो घेतल्या होत्या, त्यांनी देशातील मनुष्य प्राण्याच्या केस घेतल्या पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचे कर्तव्य करत आहोत, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जात आहोत पण आम्हाला काही दाद दिली जात नाही.

