वेबसाइटवरून याद्या गायब झाल्याबद्दल आयोगालाच काही माहिती नाही – राज ठाकरे
मुंबई-मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगासमोर ठेवल्यानंतर मला असे वाटते, ते आणि राजकीय पक्षांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत. याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २३२ जागा महायुतीच्या निवडून आल्यात. एवढ्या जागा निवडून आल्यानंतर देखील संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता, तो नव्हता. हे कसले द्योतक आहे. निवडणुकीत पडलेल्यांना धक्का बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसावा, ही कोणती निवडणूक आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहेत. हे घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत. ते सुधारून विरोधीपक्षाचे समाधान झाले पाहिजे. सत्ताधारी पक्षांचेही समाधान झाले पाहिजे. जे निवडणुका लढवतात, त्या राजकीय पक्षांचे समाधान झाल्याशिवाय आयोगाने निवडणुका घेऊ नयेत, ही आमची रास्त मागणी आहे. यात काहीच गैर नाही. निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नयेत. ही सोपी गोष्टी आहे. त्यात काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आम्ही क्लिष्ट विषय बोलत नाहीयेत, असे राज ठाकरे म्हणाले.
वृत्तवाहिनीवर खोट्या मतदार यादीची बातमी येते आणि सायंकाळी सहा वाजता ती गायब होते. त्या संपूर्ण बातमी आणि मतदार यादीबद्दल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही. आम्ही माहिती घेऊन सांगतो, असे आयोग म्हणाले. ती यादी त्यांच्या वेबसाइटवरून गायब झालीये. वृत्तवाहिनीवर दाखवल्यानंतर याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला माहिती नसेल, तर मग हे कोण करतंय? कोण काढतंय? आणि कोण घालतंय? ही बाब त्यांना विचारली गेली. त्यावर केवळ आम्ही चौकशी करून सांगतो, एवढेच निवडणूक आयोगाने सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली.
या बैठकीत ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी आयोगाकडे केली. तर मतदार याद्यांमधील घोळावरून शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
२०२२ याद्यांमध्ये फोटो, २०२५ च्या याद्यांमधून फोटो गायब – राज ठाकरे
२०२२ मध्ये जिल्हा परिषदांच्या याद्यांमध्ये फोटो आणि नावासह सगळे आहे. पण २०२५ च्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकलेत. हे सगळे निवडणूक आयोग स्वत: करतंय. पण हे का करतंय? पारदर्शकता आणत असल्याचे ते म्हणत असतील, तर या सगळ्या गोष्टी ते का आणि कशासाठी हा घोळ करत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या देशात या पहिल्या निवडणुका नाहीत. याआधी अनेक निवडणुका झाल्या. या आधीच्या निवडणुकांमध्ये असले विषय आले नाहीत. हे विषय हल्लीच का यायला लागलेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक पानासाठी दोन रुपये द्यायचे, मग आम्ही पाने घ्यायची. म्हणजे त्यात पण कमाई.
मतदान गोपनीय असते, मतदार यादी गोपनीय कशी असेल? – राज ठाकरे
मतदार याद्या गोपनीय असतात, असे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले. पण मला वाटतं मतदान गोपनीय असते ना? मतदार कसा गोपनीय असेल? दुसरी गोष्ट मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावता आणि ४५ दिवसांनंतर त्यांचे फुटेज डिलीट करता. जर निवडणूक आयोग बघू शकतो, तर आम्ही नाही का बघू शकत? निवडणूक आयोगाला निवडणुका लढवायच्या नाहीत, त्या आम्हाला लढवायच्या आहेत. निवडणूक आयोग लपवा-छपवी का करतंय? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.


