एका घरात शेकडो मतदार राहत असल्याचे मतदान यादीतल्या नोंदणीचे दिले पुरावे
मुंबई-महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना आम्ही एक निवेदन दिले. त्याद्वारे त्यांना महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील अनेक चुका दाखवल्या. त्यावर त्यांनी सीओ यांनी आम्हाला हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याची ग्वाही दिली. तसेच या याद्या दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकरक सुरू करण्याचे आश्वासनही दिले.
आम्ही निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे पुरावे दाखवले. त्या पुराव्याच्या सहीत आम्ही त्यांना काही माहिती दिली. याशिवाय आम्ही एक पत्रही त्यांना दिले आहे. त्यात मतदार यादीमधील मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा मतदार यादीत पत्ता व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फरक असल्याचेही आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले, मी मतदार यादीतील घोटाळ्याची निवडणूक आयोगाला काही उदाहरणे दिली. मुरबाड मतदारसंघातील बुथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचे एक घर आहे. यांच्या घरापुढे घर नंबर 400 नमूद करण्यात आला आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर 218 येथील 0 क्रमांकाच्या घरामध्ये 450 मतदार राहतात. कामठी विधानसभेतही 867 मतदारांचे घर निरंक आहे. म्हणजे त्यांच्या घराला क्रमांकच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेत. म्हणजे एका व्यक्तीला 2-2, 4-4, 5-5 व 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. इपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपली खात्री होती. पण मतदार याद्यांत अनेक इपिक नंबरचे मतदार असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.
ते पुढे म्हणाले, नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव 6 वेळा नोंदवण्यात आले आहे. तिचे 6 इपिक क्रमांक आहेत. माध्यमांनी पुराव्यासह हे दाखवले आहे. त्यानंतर काही तासांतच हे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. आमचा प्रश्न हा आहे की, दुपारी 3 वाजता एक बातमी येते आणि सायंकाळी 6 वा. या महिलेचे नाव वगळले जाते. ही नावे कुणी वगळली? त्याची तक्रार कुणी केली? तक्रार कधी करण्यात आली व कुणी स्थळ पाहणी केली, हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचे व्हेरिफिकेशन करण्याच्या आत तिचे नाव कुणी वगळले? आमचा दावा असा आहे की, राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरे कुणीतरीच चालवत असल्याचा आमचा समज आहे.
दुसरा कुणीतरीच परस्पर या मतदार याद्यांत नाव घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावे काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक असो, त्यांच्या हातात काहीच नाही. कुणीतरी बाहेरूनच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मतदार याद्यांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी करण्यात आल्या आहेत. आत्ता मध्य विधानसभा नाशिक मतदारसंघात घर क्रमांक 3,829 या घरात 813 मतदारांची नोंद आहे. पुढे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बुथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर तासाला मतदानाची टक्केवारी जाहीर होते. किती पुरुषांनी व महिलांनी मतदान केले हे दर तासांनी जाहीर होते. विधानसभेला ही व्यवस्था पूर्णपणे फोडण्यात आली. सायंकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केले हे केव्हाच जाहीर करण्यात आली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे.
आम्ही विधानसभेला ज्या मतदारयाद्या पाहिल्या त्याच मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरल्या तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे राहण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आयोगाला या मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

