पॅनल सिस्टिम म्हणजे भाजपचा घोटाळ्याचा फॉर्म्युला!:मुख्यमंत्री बकवासगिरी, EC त्यांच्या इशाऱ्यावर नाचतो- संजय राऊत
मुंबई-मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट EVM मशीन देणं जर निवडणूक आयोगाला शक्य नसेल तर काल आम्ही सर्वांनी जी मागणी केली बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या त्याला का घाबरत आहात तुम्ही असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये तरी बॅलेटवर निवडणुका घेतल्या पाहिजे. मी तर म्हणेल की संपूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत.
संजय राऊत म्हणाले की,यापूर्वी महाराष्ट्रात एकास एक निवडणूक झाली आहे. कशाला पाहिजे पॅनल सिस्टिम हे भाजप वाल्यांनी निवडणुकीत घोळ करण्याचे फॅड आणले आहे. एकाच भागात 4 नगरसेवक लोकांनी जायचे कुणाकडे. नाशिक, ठाण्यात एकाच भागाला 4 नगरसेवक हा बकवास पणा आहे. निवडणूक ही एकास एक असते. मुंबईमध्ये जशी एकास एक निवडणूक आहे तशी जर संपूर्ण महाराष्ट्रात झाली तर यांचा पराभव होईल. पॅनल सिस्टिम? हा बकवास आहे.
संजय राऊत म्हणाले की, 20 हजार मतदार मी बाहेरुन आणले असे मिंधे गटाचा निवडून आलेला आमदार सांगतो आहे.याची दखल घ्यायला नको का? आमची लढाई तिथे सुरू आहे. पैठण मतदारसंघात 56 हजार मतदान बोगस आणि बाहेरुन आणण्यात आले आहे. आमदारांनी 20 हजारांचा आकडा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काहीही केलेले नाही. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. फडणवीसांना महाराष्ट्रातील 25 वर्षे खासदार असलेला माणूस माहिती नसेल तर त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री जर ही बकवास-गिरी करत असेल तर त्यांची मानसिकता काय हे समजून
घ्या. उद्या आम्हीही म्हणू मोदी कोण? आम्ही तुमच्या छाताडावर बसणार हे लक्षात ठेवा. बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत 51 टक्के मते मिळणार हे सांगितले आहे. याचा अर्थ त्यांनी तितका घोटाळा केला आहे. नाही तर हा आकडा आणला कुठून असा सवाल राऊत यांनी केला आहे. अजून निवडणूक घोषित व्हायच्या आहेत आम्ही बोललो की मग आमच्यावर टीका करतात.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही मुंबईतील वार्डावार्डातील आकडे दाखवत आहोत. आम्ही दिवसभर मतदारयाद्यांवर काम करत आहोत राजकीय कार्यकर्ते तुम्हाला काय मुर्ख वाटत आहे का? निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर निवडणूक आयोग भाजपची यंत्रणा वापरत आहे. ते भाजपचे बटीक झाले आहे.

